उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीसेऊल – उत्तर कोरियाने बुधवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. उत्तर कोरियाची ही चाचणी या क्षेत्रासाठीच नाही तर जागतिक शांती आणि स्थैर्यासाठी धोका ठरत असल्याचा इशारा दक्षिण कोरियाने दिला. दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी अणुबॉम्बच्या निर्मितीचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. तसेच शत्रूवर सर्वात आधी अणुहल्ला चढविण्याची धमकी उत्तर कोरियन हुकूमशहाने दिली होती.

पुढच्या आठवड्यात, 10 मे रोजी युन सूक-येओल दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्याआधी उत्तर कोरियाने ही चाचणी घेऊन दक्षिण कोरियाला इशारा दिल्याचा दावा केला जातो. तर बुधवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून उत्तर कोरियाने आपल्या अणुहल्ल्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीगेल्या चार महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने 14 क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. यात लांब पल्ल्याच्या तसेच अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. यापैकी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात अमेरिकेची अतिपूर्वेकडील शहरे येत असल्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला होता. यानंतर उत्तर कोरियावर निर्बंध लादून अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर लष्करी सरावाची घोषणा केली होती. याचा उत्तर कोरियावर विशेष परिणाम झालेला नाही, उलट या देशाने क्षेपणास्त्र चाचण्याचा धडाका कायम ठेवल्याचे दिसत आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीउत्तर कोरियाच्या या नव्या क्षेपणास्त्र चाचणीवर अमेरिका, दक्षिण कोरिया तसेच जपानने टीका केली आहे. हुकूमशहा किम जाँग-उन यांची राजवट या चाचण्यांद्वारे कोरियन क्षेत्राची सुरक्षा व स्थैर्य धोक्यात टाकत असल्याचा आरोप दक्षिण कोरिया व जपान करीत आहे. उत्तर कोरियाच्या या धोकादायक क्षेपणास्त्र चाचणीविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंधांची कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. यासाठी येत्या काही दिवसात राष्ट्रसंघाने सुरक्षा परिषदेत मतदान घ्यावे, असे आवाहन अमेरिका करीत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन लवकरच या क्षेत्राचा दौरा करणार आहेत. त्याआधी क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावून आणि अणुहल्ल्याची धमकी देऊन उत्तर कोरियाने बायडेन यांना इशारे देण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply