उत्तर कोरियाने आण्विक क्षमता असणार्‍या ‘क्रूझ मिसाईल’ची चाचणी केली

आण्विक क्षमताप्योनग्यँग/वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने आण्विक क्षमता असणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या ‘क्रूझ’ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस चाचणी करण्यात आली असून, नवे क्षेपणास्त्र सुमारे दीड हजार किलोमीटर्सवरील लक्ष्याला भेदू शकते, असा दावा उत्तर कोरियाच्या माध्यमांकडून करण्यात आला आहे. या आठवड्यात अमेरिकेचे दूत जपान व दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर दाखल होणार आहेत. त्यापूर्वी ही चाचणी करून उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांनी धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

मार्च महिन्यात उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आण्विक हालचालींमध्ये वाढ झाल्याचा अहवालही अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केला होता. गेल्याच महिन्यात, ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ची क्षमता अधिक वाढविण्याचा इशाराही उत्तर कोरियाकडून देण्यात आला होता. त्यानंतर उत्तर कोरियाकडून दोनदा ‘नॅव्हिगेशनल वॉर्निंग’ही जारी करण्यात आली होती. ही वॉर्निंग आण्विक चाचणीची पूर्वसूचना असावी, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर शनिवार व रविवार सलग दोन दिवस घेतलेल्या चाचण्या लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था ‘केसीएनए’ने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही चाचण्यांमध्ये ‘क्रूझ’ क्षेपणास्त्राने दीड हजार किलोमीटर्सचा पल्ला गाठला असून इतर तांत्रिक निकषही पूर्ण केले आहेत. हे क्षेपणास्त्र सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्याचा दावाही वृत्तसंस्थेने केला. चाचणीचे दोन फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विश्‍लेषकांच्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाने आण्विक क्षमता असणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आण्विक क्षमताअमेरिकेसह जपान व दक्षिण कोरियाने या नव्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाच्या नव्या चाचण्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बजावले आहे. उत्तर कोरिया आपला लष्करी कार्यक्रम अधिक विकसित करण्यासाठी हालचाली करीत असल्याचे चाचण्यांवरून दिसून येत असल्याचेही अमेरिकेने म्हंटले आहे. त्याचवेळी जपान व दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचा दावाही केला. जपानने उत्तर कोरियाच्या नव्या चाचण्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तर दक्षिण कोरियाने, क्षेपणास्त्र चाचणी व त्यानंतरच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे म्हंटले आहे.

उत्तर कोरियाची ही चाचणी अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाला इशारा असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे विशेष दूत सुंग किम या आठवड्यात जपान व दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर दाखल होत आहेत. यात उत्तर कोरियाबरोबर ‘डिन्यूक्लरायझेशन’च्या मुद्यावर चर्चा सुरू करण्याबाबत बोलणी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांनी दडपण वाढविण्यासाठी चाचण्या केल्या असाव्यात, असे सांगण्यात येते.

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांच्यादरम्यान झालेली बैठक अपयशी ठरली होती. त्यानंतर दोन देशांमधील चर्चा पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेकडून अनेकदा चर्चेची तयारी दर्शविण्यात आली असली तरी उत्तर कोरियाने त्यासाठी घातलेल्या अटी मान्य करण्याचे नाकारले आहे. निर्बंध शिथिल करणे व दक्षिण कोरियातील सैन्य मागे घेणे यासारख्या अटी उत्तर कोरियाने घातल्या आहेत. अमेरिकेने अटी नाकारल्याने उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या आण्विक सामर्थ्यात वाढ करण्यास सुरुवात केल्याचे चाचण्यांवरून दिसून येते.

leave a reply