अणुकराराचा निकाल लागला, इराण लवकरच अण्वस्त्रसज्ज बनेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कबुली देत असल्याचा व्हिडिओ जगासमोर आला

nuclear-armedवॉशिंग्टन – इराणबरोबरील अणुकरार केव्हाच निकालात निघालेला आहे. लवकरच इराण अण्वस्त्रसज्ज बनेल, अशी कबुली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. इराणच्या राजवटीविरोधात अमेरिकेत निदर्शने करणाऱ्या महिलेशी बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ही कबुली दिल्याचे व्हिडिओतून उघड होत आहे. अणुकराराबाबत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या व्हिडिओत केलेल्या विधानांचे इस्रायलने स्वागत केले आहे. मात्र इराण लवकरच अण्वस्त्रसज्ज होईल, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले विधान, इस्रायलमध्ये नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर येत असतानाच जगासमोर आले, हा योगायोग लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या महिन्यापर्यंत अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकांची धामधूम सुरू होती. यासाठी अमेरिकेतील दोन्ही पक्षांकडून मोठमोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. ४ नोव्हेंबर रोजी डेमोक्रॅट्स पक्षाने कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलेल्या सभेसाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन उपस्थित होते. या सभेत इराणवंशियांनी सहभाग घेतला होता. ही सभा संपल्यानंतर बाहेर पडत असताना एका इराणी महिलेने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना हाक देत इराणच्या अणुकराराबाबत प्रश्न केला.

यावर उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबरील अणुकरार केव्हाच निकालात निघाल्याचे सांगितले. पण काही कारणास्तव अमेरिका याची घोषणा करणार नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. पुढे ‘आम्ही एक गोष्ट नक्की करू…’, असे बोलत असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वाक्य शेजारी उभ्या असलेल्या अधिकाऱ्याने कापले. यानंतर त्या महिलेने इराणमधील आयातुल्ला खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे नाव न घेता ताशेरे ओढले.

‘इराणमधील राजवट इराणी जनतेचे प्रतिनिधीत्व करीत नाही. ते आमचे सरकार नाही’, अशी टीका या महिलेने केली. ‘हो, इराणचे सरकार तुमचे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, हे आम्हाला ठाऊक आहे. पण लवकरच इराण अण्वस्त्रसज्ज बनेल, हीच अण्वस्त्रे इराणचे प्रतिनिधीत्व करतील’, अशी धक्का देणारी कबुली राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली.

याआधी बायडेन यांनी माध्यमांसमोर दिलेली विधाने व्हाईट हाऊसने मागे घेतल्याची उदाहरणे आहेत. पण यावेळी व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी बायडेन यांच्या विधानांचे समर्थन केले. तसेच येत्या काळात इराणबरोबर अणुकरार होईल, अशी अजिबात शक्यताही नसल्याचा दावा किर्बी यांनी केला. तर ही काही आमच्यासाठी प्राथमिकता नसल्याचे लक्षवेधी विधान किर्बी यांनी केले.

दरम्यान, येत्या काही तासात बेंजामिन नेत्यान्याहू इस्रायलमधील सरकार स्थापनेची घोषणा करणार आहेत. त्याआधी बायडेन यांनी इराणबरोबरच्या अणुकराराबाबत केलेले विधान व त्यावर व्हाईट हाऊसची आलेली प्रतिक्रिया इस्रायलमधील नेत्यान्याहू सरकारसाठी इशारा असल्याचे दिसत आहे. गेली दीड वर्षे बायडेन यांच्या प्रशासनाने इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्याला प्राथमिकता दिली होती. इस्रायल, सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानंतरही बायडेन प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल केला नव्हता. पण नेत्यान्याहू यांच्या सरकार स्थापनेच्या काही तास आधी इराण अण्वस्त्रसज्ज बनत आहे व त्याला प्राथमिकता देत नसल्याचे सांगून बायडेन प्रशासन इस्रायलला इशारा देत आहे.

leave a reply