जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाखांच्याही पुढे गेली

प्रिटोरिया – कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील बळींची एकूण संख्या साडेतीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाखांच्याही पुढे गेले असून जवळपास २४ लाख जण या साथीतून बरे झाले आहेत. या साथीमुळे जगभरातील उद्योग, व्यापार व रोजगारावर परिणाम झाला आहे. तर या साथीमुळे आफ्रिकेतील सोन्याची सर्वात मोठी खाण देखील बंद करण्यात आली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी जगभरातील कोरोनाच्या बळींच्या संख्येत घट तर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात या साथीने ३,१०० हून अधिक रुग्ण दगावले आहेत. यामध्ये अमेरिकेतील ५३२, युरोपमधील ५८८ व ब्राझीलमधील ८०७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ब्राझीलमध्ये अमेरिकेहून कोरोनाचुआ अधिक जणांचा बळी गेल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील या साथीने आतापर्यंत ९९,८०५ जणांचा बळी घेतला आहे.

कोरोनाच्या बळींमध्ये घट होत असली तरी, या साथीचा रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे. जगभरातल्या या साथीच्या रुग्णांची संख्या ५६,२२,९३९ वर पोहोचली असून गेल्या चोवीस तासातील नव्वद हजाराहून अधिक नव्या रुग्णांचा यात समावेश आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात अमेरिकेत १९,७९०, युरोपात १४,८०० तर ब्राझीलमध्ये ११,६८७ आणि रशियामध्ये ८,९१५ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेल्या आफ्रिकेमध्ये चोवीस तासात ३,९९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसचा फटका सोन्याच्या उत्खननाला बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मोनेंग येथील जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण बंद करण्यात आली आहे. ‘एंगलोगोल्ड एशांटी’ या खाण्यातील १६४ खाण कामगारांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर ही खाण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीच कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, सदर खाण ५० टक्के कामगारांसह सुरू होती. सुमारे चार किलोमीटर खोलपर्यंत खणलेल्या या खाणीत जवळपास ३३ लाख औंस सोन्याचा साठा असल्याचा दावा केला जातो. जगातील सर्वात मोठ्या सोन्याचा तीन खाणींमध्ये एंगलोगोल्ड एशांटी या खाणीचा समावेश केला जातो.

leave a reply