पुढच्या आठवड्यात जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या कोटीवर जाईल – ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांचा दावा

जीनिव्हा – कोरोनाव्हायरसने गेल्या चोवीस तासात जगभरात ५,१०० जणांचा बळी घेतला असून जगभरातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ४,८६,००० च्या पुढे गेली आहे. तर या चोवीस तासात जगभरात कोरोनाच्या १,७२,००० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याच वेगाने जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुढच्या आठवड्यात जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीवर जाईल, असा दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांनी केला. त्याचबरोबर जगभरातील या साथीच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची चिंताही घेब्रेस्यूएस यांनी व्यक्त केली. सध्या जगभरात कोरोनाचे ९५,७३,२२३ रुग्ण आहेत.

‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख घेब्रेस्यूएस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना जगभरातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. अमेरिका आणि ब्राझीलमधील कोरोनाच्या साथीने अद्याप वेग धरलेला नसल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी दिली. अशा परिस्थितीतही, पुढच्या आठवड्यात जगभरातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या एक कोटीपर्यंत पोहोचू शकते, असे घेब्रेस्यूएस म्हणाले. तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन सिलेंडर्स संबंधित देशांना पुरवण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ तयार आहे. पण ऑक्सिजन सिलेंडरची वाढती मागणी आणि त्यांचा साठा यात फार मोठी तफावत असल्याचे घेब्रेस्यूएस यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि लॅटिन अमेरिकी देशांमधील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ’च्या अन्य अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाचे ३८ हजाराहून अधिक नवे रुग्ण सापडले असून या देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या चोवीस लाखांच्या वर गेली आहे. तर या साथीने अमेरिकेत १,२४,३०३ जणांचा बळी घेतला आहे. तर ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात ४२,७२५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबर या देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ११,९३,००० हजाराच्या वर गेली असून या साथीने आत्तापर्यंत ब्राझीलमध्ये ५३ हजार जणांचा बळी घेतला आहे.

दरम्यान, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये या साथीची दुसरी लाट येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना देत आहे. तर युरोपीय देशांमध्ये लवकरच या साथीची दुसरी लाट धडकेल, असेही या संघटनेने काही दिवसांपूर्वी बजावले होते. पण चीनच्या शहरांमध्ये पसरलेल्या या साथीच्या दुसऱ्या लाटेबाबत ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख काही बोलण्यास तयार नाहीत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असून शहरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा इशारा येथील अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख घेब्रेस्यूएस चीनमधील कोरोनाची माहिती दडवीत असल्याचे आरोप पुन्हा वेग धरत आहेत.

leave a reply