महाराष्ट्रातील कोरोनाच्या बळींची संख्या 3500 ने वाढली

मुंबई – महाराष्ट्रात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या कोरोनाच्या बळींची संख्या 3500 ने वाढली आहे. ही वाढ एका दिवसातील नाही. मात्र हे मृत्यू कोरोनाने झाल्याची नोंद झाली नव्हती. तपासात हे कोरोनाचे बळी असल्याचे स्पष्ट झाल्यावर याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली. याशिवाय बुधवारच्या दिवसात राज्यात 165 जण कोरोनाने दगावले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील एकूण बळींची संख्या 1 लाख 39 हजार 918 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनामुळे झाले मृत्यू 4 लाख 18 हजार 500 च्या पुढे गेले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या बळींची संख्या 3500 ने वाढलीदेेशात कारोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात झालेल्या रुग्णवाढीवरून हे दिसून येत आहे. केरळमध्ये बुधवारी एकाच दिवसात 17 हजार 481 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1 लाख 46 हजार नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी सुमारे साडे सतरा हजार जण बाधीत झाले. यामुळे केरळातील कोरोना पॉझिटिव्ह दर 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. केरळात 1 लाख 29 हजाराहून अधिक अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण असून देशात सर्वाधिक रुग्ण याच राज्यात आहे. त्यामुळे संचारबंदीच्या नियमात कोणतीही सुट देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला असून विकएन्डला संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ दिसून आली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 8159 नवे रुग्ण आढळले. तर 7839 जण बरे झाले. बरे होणर्‍या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची नोंद अधिक असल्याचे चिंता वाढल्या आहेत. याशिवाय देशात सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहे. बुधवारीही 165 जण दगावल्याची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात अ‍ॅक्टीव्ह केसेसची संख्या सुमारे 95 हजार इतकी आहे. मात्र गेल्या काही दिवसात घटलेली रुग्ण संख्या हळूहळू पुन्हा वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक असून नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच या जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा, असा सल्ला केंद्रीय पथकाने दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याचे म्हटले आहे. यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, नंदूरबार यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 3509 ने वाढली. त्यामुळे बुधवारच्या सकाळपर्यंत देशात चोवीस तासात 3998 बळी गेल्याचे नोंदविण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. पण महाराष्ट्रात नोंदविण्यात आलेले हे बळी एका दिवसातील नाहीत, असेही केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

leave a reply