जगभरात चोवीस तासात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या लाखावर

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चोवीस तासात पाच हजारांहून अधिक जण दगावले. तर या एका दिवसात जगभरातील २१२ देशांमध्ये एक लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. या साथीतून आत्तापर्यंत २५ लाखांहून अधिक जण बरे झाले असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. पण जगभरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत या देशांमध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे.

जॉन हॉपकीन्स विद्यापीठ, वर्ल्डोमीटर आणि जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जगभरात या साथीने ३,५८,४२६ जण दगावले आहेत. यामध्ये गेल्या चोवीस तासातील ५,१८६ रूग्णांचा समावेश आहे. यापैकी कोरोनाच्या एक लाख बळींचा टप्पा ओलांडणाऱ्या अमेरिकेत गेल्या चोवीस तासात १,५३५ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चार दिवसात पहिल्यांदाच अमेरिकेत पंधराशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर या एका दिवसात ब्राझीलमध्ये १,०८६ जण दगावले असून सलग दुसऱ्या दिवशी ब्राझीलमध्ये हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८,३३,७६६ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरातील १,०३,००० नव्या रुग्णांची नोंद झाली असून या आठवड्यात दुसऱ्यांदा एका दिवसात या साथीचे एक लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या चोवीस तासात अमेरिका आणि ब्राझीलमध्ये प्रत्येकी वीस हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर युरोपमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजारांनी वाढली आहे. आफ्रिकेतील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचा दावा आफ्रिकेतील आरोग्य संघटनेने केला आहे. आफ्रिकेत या साथीचे सव्वा लाख रुग्ण असून एकट्या दक्षिण आफ्रिकेत याचे पंचवीस हजार रुग्ण आहेत.

दरम्यान, या साथीची दुसरी लाट आलेल्या चीन आणि दक्षिण कोरियामध्ये गुरुवारी देखील कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. दक्षिण कोरियात एकाच दिवसात ७९ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच दक्षिण कोरियात या साथीच्या रुग्णांमध्ये एवढी वाढ झाल्यानंतर दक्षिण कोरियन प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पुन्हा लागू केले आहेत. तर दक्षिण कोरियाच्या शेजारी असलेल्या उत्तर कोरियामध्ये या साथीने थैमान घातल्याचा दावा केला जातो. पण या देशात हुकुमशाही राजवटीने कोरोनाच्या बळींची आणि रुग्णांची खरी माहिती उघड केलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाश्चिमात्य देशांनी उत्तर कोरियातील आपले दूतावास बंद करून कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलवण्यास सुरुवात केली आहे.

leave a reply