अन्यथा तुर्कीला लिबियन बंडखोरांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल

जनरल हफ्तार यांचा तुर्कीला इशारा

त्रिपोली – ‘तुर्कीचे रा़ष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपले जवान आणि दहशतवाद्यांना लिबियातून माघारी घ्यावे. अन्यथा, तुर्कीला भीषण कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा सज्जड इशारा लिबियाचे बंडखोर नेते जनरल खलिफा हफ्तार यांनी दिला. काही तासांपूर्वी ‘संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) तुर्कीला अरब देशांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, असे कठोर शब्दात बजावले होते.

Haftar-Turkiलिबियातील फयाज अल-सराज यांच्या राजवटीच्या समर्थनासाठी तुर्कीने सिरियातून कंत्राटी जवानांचे मोठे पथक रवाना केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तुर्कीने लिबियात संघर्षासाठी किमान १६,५०० मर्सिनरीज् म्हणजे कंत्राटी जवान शस्त्रसाठ्यासह रवाना केले आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ३५० मुलांचाही समावेश असल्याची सिरियातील मानवाधिकार संघटनेने केली. त्याचबरोबर या जवानांमध्ये सिरियातील ‘आयएस’चे दहशतवादी आणि कट्टरपंथीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून तुर्की लिबियाला ’दुसरा सिरिया’ बनवित असल्याचा इशारा या मानवाधिकार संघटनेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर लिबियातील बंडखोर संघटनेचे प्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांनी तुर्कीला इशारा दिला. ’तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष लिबियामध्ये लष्कर घुसवून आपल्या पूर्वजांचा वारसा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण तुर्कीच्या लष्कराला यामध्ये यश मिळण्यासाठी आमच्या गोळ्यांचा सामना करावा लागेल. तुर्कीच्या कुठल्याही जवानाची अजिबात गय केली जाणार नाही. लिबियन नागरिक तुर्कांचे गुलाम होणे अजिबात खपवून घेणार नाहीत’, असे हफ्तार यांनी बजावले. जनरल हफ्तार यांनी तुर्कीला इशारा देऊन पुढील परिणामांची जाणीव करून दिल्याचा दावा केला जातो.

Haftar-Turkiलिबियातील आपला हा संघर्ष सराज यांची राजवट किंवा त्यांच्या राजवटीला समर्थन देणारे कट्टरपंथी किंवा दहशतवाद्यांच्या विरोधात मर्यादित नाही. लिबियातील हा संघर्ष आपल्याला गुलाम बनवू पाहणार्‍या तुर्कीच्या विरोधातही असेल असे संकेत जनरल हफ्तार यांनी आपल्या या इशार्‍यातून दिल्याचे ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील अभ्यासक सॅम्युअल रमानी यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी इजिप्तने देखील तुर्कीला लिबियातील संघर्षापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. तर ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री गरगाश यांनी देखील काही तासांपूर्वी तुर्कीला अरब देशांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये’, असे फटकारले होते.

दरम्यान, लिबियातील संघर्ष वेळीच रोखला नाही तर, या क्षेत्रात मोठे युद्ध पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तुर्की लिबियातील सराज राजवटीचे समर्थन करीत असून रशिया, सौदी अरेबिया, युएई, इजिप्त तसेच फ्रान्स हफ्तार बंडखोरांना समर्थन देत आहेत.

leave a reply