वायुसेनेच्या तळावरील घातपातामागे पाकिस्तानच्या सहभागाची दाट शक्यता

- केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

नवी दिल्ली – वायुसेनेच्या जम्मूमधील तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सीमेतून एके-47 रायफली व अमली पदार्थांची ड्रोनद्वारे तस्करी केली जात होती, याकडे लक्ष वेधून गृहराज्यमंत्र्यांनी जम्मूमधील घातपातामागे पाकिस्तान असण्याची दाट शक्यता वर्तविली. याबाबतीत तपास सुरू असून त्याचा निष्कर्ष समोर येण्यासाठी काही काळ जावा लागेल, असेही रेड्डी पुढे म्हणाले. मात्र भारताचे माजी लष्करी अधिकारी पाकिस्तानने ही आगळीक करून फार मोठी चूक केली आणि याचे परिणाम लवकरच पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशारा देत आहेत.

वायुसेनेच्या तळावरील घातपातामागे पाकिस्तानच्या सहभागाची दाट शक्यता - केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डीमंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन केले होते. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा सहभाग होता. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत. पण ड्रोन हल्ल्यांपासून तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून होणार्‍या हल्ल्यांपासून देशाच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांवर यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पुढच्या काळात असे हल्ले टाळण्यासाठी ड्रोन्सबाबत आवश्यक ते धोरण ठरविण्याची परवानगी पंतप्रधानांनी यावेळी संरक्षणमंत्र्यांना दिल्याचे दावे माध्यमांमध्ये आले आहेत. विशेषतः संरक्षणदलांना यासंदर्भात अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर ड्रोन्सद्वारे दोन स्फोट घडविल्यानंतर, पुढच्या काही तासात सीमेवर पुन्हा ड्रोन्सची घुसखोरी झाल्याचे समोर आले होते. मात्र सुरक्षा दलांच्या जवानांनी हा घुसखोरीचा कट उधळला. यामुळे पुढच्या काळात ड्रोन्सची घुसखोरी व त्याद्वारे घातपात माजविण्याचे प्रयत्न पाकिस्तान सोडून देणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भारताने अधिकृत पातळीवर यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलेले नाही. याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिकृत पातळीवर माहिती घोषित करण्यात येईल. वायुसेनेच्या तळावर स्फोट घडविणारे ड्रोन्स जम्मूमधील या तळापासून 14 किलोमीटरवर असलेल्या पाकिस्तानातून नियंत्रित केले जात होते, की जम्मूमधीलच पाकिस्तानच्या हस्तकांमार्फत हा घातपात घडविण्यात आला, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यामागे पाकिस्तानचा हात आहे, याबाबत दुमत असू शकत नाही, असे दावे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक करीत आहेत.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीही या प्रकरणी पाकिस्तानवर दाट संशय असल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानने ड्रोनद्वारे एके-47 रायफली व अमली पदार्थांची तस्करी केल्याचे उघड झाले होते. सुरक्षा दलांनी कितीतरी वेळा हे प्रयत्न उधळून लावले आणि पाकिस्तानचे ड्रोन्स पाडलेले आहेत, याची आठवण जी. किशन रेड्डी यांनी करून दिली. त्यामुळे सदर घातपातामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे गृहराज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या घातपातानंतर भारताची प्रतिक्रिया काय असू शकते, याचा अंदाज पाकिस्तानची माध्यमे घेत आहेत. पाकिस्तानचे पत्रकार भारतीय विश्‍लेषक व माजी लष्करी अधिकार्‍यांना याबाबत सातत्याने विचारणा करीत आहेत. हा घातपात घडवून पाकिस्तानने फार मोठी कल्पकता दाखवली खरी, पण याचे दुष्परिणाम किती भयंकर असू शकतात, याचा पाकिस्तानने विचार केला नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करी अधिकारी देत आहे. जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे ड्रोनचा वापर करून दहशतवादी हल्ले घडविण्याची क्षमता असेल, तर अशीच क्षमता बलोचिस्तान व पाकिस्तानच्या इतर प्रांतातील बंडखोरांकडेही येऊ शकते, असे माजी लष्करी अधिकारी पाकिस्तानला बजावत आहेत. इतकेच नाही तर भारत आपल्या भूभागावरी ड्रोन हल्ल्यांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवून उत्तर देऊ शकतो, याचीही जाणीव या अधिकार्‍यांकडून पाकिस्तानला करून दिली जात आहे.

leave a reply