पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र आहे याचा जगाला विसर पडलेला नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला

दहशतवादाचे केंद्रसंयुक्त राष्ट्रसंघ – परसदारात साप पाळून ते दुसऱ्यांना डसतील अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. ते साप तुमच्यावरही उलटल्याखेरीज राहणार नाहीत, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदावर असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला बजावले होते. त्यावेळच्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्यासमोरच क्लिंटन यांनी हे उद्गार काढले होते. सध्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या खार यांनी भारतावरच दहशतवादाचे आरोप केल्यानंतर, भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी क्लिंटन यांच्या त्या उद्गारांची आठवण करून दिली आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगाच्या स्मरणशक्तीवर ताण आला असला, तरी पाकिस्तान हे दहशतवादाचे जागतिक केंद्र आहे, याचा जगाला विसर पडलेला नाही, कारण जग मुर्ख नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी खडसावले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताने दहशतवाद पसरविल्याचे आरोप केले होते. त्याच्या आधी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताइतका सफाईदारपणे कुणीही दहशतवादाचा वापर करीत नसल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करणारा देश, अशा शब्दात पाकिस्तानची संभावना केली होती. इतकेच नाही, तर एका पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर यांनी हिना रब्बानी खार यांच्यासमोरच अमेरिकेच्या त्यावेळच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दहशतवादाबाबत पाकिस्तानवर केलेल्या खरमरीत टीकेचा दाखला दिला.

आपल्या परसदरात साप पाळणाऱ्यांना, हे साप शेजाऱ्यांना डसतील अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. ते साप तुमच्यावर उलटल्यावाचून राहणार नाहीत, असे हिलरी क्लिंटन यांनी आपल्या पाकिस्तानच्या दौऱ्यात बजावले होते. त्याची आठवण करून देऊन जयशंकर यांनी जग पाकिस्तानकडे दहशतवादाचे केंद्र म्हणूनच पाहत असल्याची जाणीव करून दिली. कोरोनाच्या साथीमुळे जगाच्या स्मरणशक्तीवर कदाचित थोडाफार ताण आलाही असेल. मात्र पाकिस्तानच्या कारवाया नजरेआड करता येणार नाही. कारण जग मुर्ख नाही आणि इतके क्षमाशीलही नाही, अशा शब्दात जयशंकर यांनी हिना रब्बानी खार यांनी भारतावर केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.

न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषद संबोधित करणाऱ्या जयशंकर यांना पाकिस्तानच्या एका पत्रकाराने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील दहशतवादाचा खेळ आणखी किती काळ सुरू राहणार, असा प्रश्न केला होता. ‘तुम्ही हा प्रश्न चुकीच्या परराष्ट्रमंत्र्यांना केलेला आहे, हा प्रश्न खरेतर पाकिस्तानच्याच परराष्ट्रमंत्र्यांना करायला हवा. कारण पाकिस्तानच दहशतवाद माजवित आहे, त्यामुळे याचे उत्तर पाकिस्तानचेच परराष्ट्रमंत्री देऊ शकतील’, असा टोला जयशंकर यांनी लगावला. भारताकडून मिळालेल्या या राजनैतिक पातळीवरील जबरदस्त प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांचा तोल ढासळल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अशोभनीय भाषेत टीका केली. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची जळजळीत प्र्रतिक्रिया आली आहे.

बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा पाकिस्तानसारख्या देशालाही न शोभण्याइतकी खालच्या पातळीवरील आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने बंगालीभाषिक व हिंदूधर्मियांचे नृशंस हत्याकांड केले होते व याचा परिणाम 1971 सालच्या 16 डिसेंबर रोजी समोर आला होता, हा इतिहास पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री विसरले आहेत, याचीही जाणीव अरिंदम बागची यांनी करून दिली. त्यामुळे दहशतवादाचा राष्ट्रीय धोरण म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपली हताशा अशारितीने व्यक्त न करता, दहशतवादविरोधी कारवायांकडे लक्ष केंद्रीत करावे, असे बागची यांनी बजावले आहे.

याबरोबरच लादेनला आश्रय देणारा पाकिस्तान हे झकीउर रेहमान लख्वी, हफीज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम या दहशतवाद्यांचे घर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेले 126 जण पाकिस्तानात वास्तव्य करून आहेत. पाकिस्तानला आत्तापर्यंत चार वेळा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये सहभागी करण्यात आले होते, याकडेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.

leave a reply