पाकिस्तान अफगाण सीमेवर लष्करी मोहीम छेडणार

- स्थानिक माध्यमांचा दावा

लष्करी मोहीमइस्लामाबाद – अफगाणिस्तानचे तालिबान आणि पाकिस्तानचे लष्कर यांच्यात ड्युरंड सीमेवर झालेल्या संघर्षात सहा पाकिस्तानींचा बळी गेला असून 17 जण जखमी झाले होते. तसेच तालिबानने ड्युरंड लाईनवर पाकिस्तानी लष्कराने उभारलेले तारेचे कुंपणही उखडून टाकले. तालिबानच्या या कारवाईवर पाकिस्तानात संताप व्यक्त होत आहे. लवकरच अफगाणिस्तानच्या सीमेवर मोठी लष्करी मोहीम छेडण्याची तयारी पाकिस्तानने केल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानच्या लष्कराची ही मोहिम ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांविरोधात असेल, असे दावे केले जातात. पण ड्युरंड लाईनवरचा हल्ला तेहरिकने नाही, तर तालिबानच्या राजवटीचा भाग असलेल्या अफगाणी सुरक्षा दलांनी केला, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

लष्करी मोहीमअफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील ड्युरंड लाईनचा वाद अधिकच पेटत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालिबान आणि पाकिस्तानी लष्करात संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. तर कुनार प्रांताच्या सीमेवर तालिबान पाकिस्तानी जवानांदेखत तारेचे कुंपण उखडून टाकत आहेत. रविवारी स्पिन बोल्दाक-चमन सीमेवर तालिबानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सहा जण ठार झाले. पाकिस्तानने याबाबत खडसावल्यानंतर तालिबानने सीमेवरील कारवाईसाठी माफी मागितली व यापुढे अशी कारवाई करणार नसल्याचे सांगितल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी केला. पण तालिबानकडून याला दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री असे दावे करीत असले तरी, पाकिस्तानी लष्कराने अफगाण सीमेवर लष्करी मोहिमेची तयारी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत अफगाण सीमेतून वाढती घुसखोरी रोखण्यासाठी लष्करी मोहीम छेडण्याचा निर्णय घेतला. तसेच काबुलमधील पाकिस्तानी राजदूतांवर झालेल्या हल्ल्याला उत्तर देण्याचे या बैठकीत निश्चित झाले. यासाठी ड्युरंड सीमेतून घुसखोरी करणाऱ्या तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांवर कारवाई केली जाईल, असे दावे केले जातात.

पण ड्युरंड सीमावादावर अफगाण तालिबान पाकिस्तानी लष्कराला आव्हान देत आहेत. तर पाकिस्तानी राजदूतांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तेहरिकच्या नाही तर आयएस-खोरासनच्या दहशतवाद्याने स्वीकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर या दोघांना वगळून तेहरिकला लक्ष्य करणार आहे, या विसंगतीवर विश्लेषकांनी बोट ठेवले आहे.

leave a reply