भारतात दहशतवादी घुसविण्याचा पाकिस्तानचा एक कलमी कार्यक्रम सुरुच

- भारतीय लष्करप्रमुखांचा आरोप

नवी दिल्ली – ‘सारे जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करीत आहे. पण पाकिस्तानला मात्र या साथीशी लढण्यात अजिबात स्वारस्य नाही. या साथीमुळे पाकिस्तानच्या आरोग्ययंत्रणेची दैना उडाली आहे. अशा काळातही पाकिस्तान आपल्या भवितव्याचा विचार न करता भारतात दहशतवादी घुसवून आपला एककलमी कार्यक्रम राबवित आहे’, असा टोला भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लगावला. पण पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशारा जनरल नरवणे यांनी पाकिस्ताला दिला.

शनिवारी मध्यरात्री जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले होते. या शहीदांचा साऱ्या भारताला अभिमान आहे. शहीदांच्या कुटुंबाच्या पाठीशी भारतीय लष्कर ठामपणे उभे राहील, असे सांगून जनरल नरवणे यांनी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. या हल्ल्याविषयी बोलताना जनरल नरवणे यांनी पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली.

पाकिस्तान आपल्या भवितव्याचा विचार न करता भारतात दहशतवादी घुसविण्याचा एककलमी कार्यक्रम अजूनही राबवित आहे. पण भारतीय लष्कर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही. पाकिस्तान भारतासह अफगाणिस्तानमध्येही छुपे युध्द करीत असल्याचा आरोप जनरल नरवणे यांनी लगावला. जग सध्या कोरोनाव्हायरसचा सामना करीत आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाने कहर केला आहे. पाकिस्तानची आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. पण पाकिस्तान पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका जनरल नरवणे यांनी ठेवला.

दरम्यान, सोमवारीही जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता. भारतीय लष्करही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उडवून देत असल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानी लष्कराचे फार मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. अशारितीने वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी भारताने नियंत्रणरेषेवर स्पाईक क्षेपणास्त्र तैनात केल्याचे दावे केले जातात.

नियंत्रणरेषेवरील या संघर्षात पाकिस्तानला फार मोठी हानी सहन करावी लागत असली तरी पाकिस्तानचे लष्कर मात्र या संघर्षात आपली सरशी होत असल्याचा प्रचार करीत आहे. पाकिस्तानच्या काही माजी लष्करी अधिकाऱ्यांना हा खोटारडेपणा मान्य नाही. पाकिस्तानचे लष्कर भारताला मुँहतोड जवाब दिला जात असल्याचे दावे करीत आहे खरे पण असे उत्तर दिल्यानंतरही भारताकडून दुसऱ्या दिवशी गोळीबार कसा केला जातो, असा प्रश्न पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. पाकिस्तानी लष्कराने आपल्या जनतेशी खोटे बोलणे टाळावे असा सल्ला अधिकाऱ्याने आपल्या लष्कराला दिला आहे.

leave a reply