तेहरिकवरील कारवाईच्या मोबदल्यात मान्यता देण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव तालिबानने धुडकावला

पाकिस्तानचा प्रस्तावकाबुल/इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता हवी असेल तर तालिबानने ‘तेहरिक-ए-तालिबान`वर कारवाई करावी. अन्यथा तालिबानचे नुकसान होईल, असा इशारा पाकिस्तानने तालिबानला दिला होता. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाकिस्तान तालिबानला तेहरिकवरील कारवाईचा प्रस्ताव देत आहे. यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ अफगाणिस्तानचा दौरा करणार आहेत. पण हा प्रस्ताव तालिबानने आधीच धुडकावल्याची बातमी पाकिस्तानच्या वर्तमानपत्राने दिली.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाण तालिबानला ‘तेहरिक-ए-तालिबान`वर (टीटीपी) कारवाई करण्याची सूचना केली होती. या प्रस्तावाबरोबरच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने तालिबानला इशारा दिल्याचे म्हटले आहे. तालिबानने पाकिस्तानची मागणी मान्य करून तेहरिकवर कारवाई केली नाही तर, तालिबानचे नुकसान होईल, असे बजावल्याची माहिती सदर अधिकाऱ्याने दिली. ‘तालिबान पाकिस्तानच्याच मागण्या मान्य करीत नसेल तर आंतरराष्ट्रीय समुदायलाही तालिबान आपले ऐकणार नाही, असे वाटू लागेल. तसे झाले तर तालिबानला मान्यता मिळणार नाही`, असा तर्क पाकिस्तान मांडत आहे.

तेहरिकचे सारे नेते अफगाणिस्तानात तालिबानच्या सुरक्षेखाली असल्याचा आरोप या पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला. तालिबानने तेहरिकच्या नेत्यांना आमच्या हवाली करावे, अशी पाकिस्तानची मागणी आहे. पण तालिबानने पाकिस्तानची मागणी मान्य केली नसल्याचे या अधिकाऱ्याने पाकिस्तानी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. याउलट आपण पाकिस्तानवर अवलंबून नसल्याचे संकेत तालिबान देत असल्याची टीका पाकिस्तानी अधिकाऱ्याने वर्तमानपत्राशी बोलताना केली.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ अफगाणिस्तानला भेट देऊन तालिबानच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून ड्युरंड लाईनवर तालिबानकडून पाकिस्तानच्या लष्कराला मिळणाऱ्या धमक्या आणि पाकिस्तानच्या सीमेत तेहरिकच्या सुरू असलेल्या कारवाया, या दोन मुद्यांवर मोईद युसूफ चर्चा करणार असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर, हा देश आपल्या अधिपत्याखाली येईल, असा समज पाकिस्तानने करून घेतला होता. यामुळेच तालिबानच्या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोष झाला होता. पण हा विजयोत्सव अल्पजिवी ठरेल, असे अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डेव्हिड पेट्रॉस यांनी बजावले होते. त्याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे. तालिबानने पाकिस्तानवर दडपण कायम ठेवण्यासाठी ‘तेहरिक-ए-तालिबान`शी संबंध कायम ठेवले आहेत. इतकेच नाही तर ‘तेहरिक` म्हणजे तालिबानची पाकिस्तानच्या विरोधातील विमा पॉलिसी असल्याचे दावे पाकिस्तानचे पत्रकारच करीत आहेत. यामुळे तालिबानला इतके सहाय्य करून त्यासाठी बदनामीबरोबरच मोठी किंमत चुकती करणाऱ्या पाकिस्तानच्या हाती निराशा व गंभीर धोक्याच्या पलिकडे काहीच लागले नाही, अशी चर्चा पाकिस्तानात सुरू झाली आहे.

leave a reply