चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी`मुळे जनतेत नाराजी व असंतोषाची भावना

‘झिरो कोविड पॉलिसी`बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून कोरोना साथीविरोधात राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो कोविड पॉलिसी`चे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपूर्वी वुहानसह इतर भागांमध्ये यशस्वीरित्या राबविलेल्या या धोरणाविरोधात आता स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. चीनमधील सोशल मीडियावर विविध फोटोग्राफ्स, व्हिडिओ व पोस्टस्‌‍मधून जनतेमधील याविरोधातला असंतोष समोर येत आहे. त्यानंतरही चीनच्या राजवटीने धोरण न बदलण्याचे संकेत दिले असून निर्बंध अधिक कठोर केले आहेत.

गेल्या काही महिन्यात चीनमधील विविध प्रांत व शहरांमध्ये एकापाठोपाठ एक कोरोनाचे उद्रेक होत आहेत. डिसेंबर व जानेवारी दोन महिन्यांमध्येच चीनमधील पाचहून अधिक शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढल्याचे आढळले आहे. त्यात शिआन, युझोऊ, तिआन्जिन, अनियांग व डालिअन या शहरांचा समावेश आहे. यातील तिआन्जिन व डालिआन ही दोन्ही शहरे राजधानी बीजिंगपासून जवळ असल्याने चीनच्या सत्ताधारी राजवटीची चिंता अधिकच वाढली आहे.

या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये ‘ल्युनार न्यू इअर फेस्टिव्हल` असून पुढील महिन्याच्या सुरुवातील हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा सरू होत आहेत. त्यामुळे चीनमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची तसेच परदेशी पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा वाढलेला फैलाव चीनच्या ‘झीरो कोविड पॉलिसी`वर प्रश्‍न उपस्थित करीत आहे. शिआनसारख्या शहरात एक महिन्याहून अधिक काळ कठोर निर्बंध लागू असतानाही कोरोनच्या रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेलीआहे.

‘झिरो कोविड पॉलिसी`युझोऊ शहरात लॉकडाऊन सुरू असून तिआन्जिनमध्ये महिन्याच्या आत दुसऱ्यांदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निर्बंध लागू असतानाही तिआन्जिनमधून डालिअनमध्ये गेलेल्या नागरिकांकडून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याचे समोर आले आहे. निर्बंध लादलेल्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून मध्यरात्रीच हजारो नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे. कोरोना झालेल्यांना ‘मेटल बॉक्स`मध्ये राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. काही भागांमध्ये नागरिक व सुरक्षायंत्रणांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. स्थानिक प्रशासन, अधिकारी व स्वयंसेवक कोरोनाची साथ रोखण्यासाठी जनतेला वेठीला धरत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लॉकडाऊन लागू केलेल्या शहरांमध्ये स्थानिक जनतेला अन्नधान्य व आवश्‍यक त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही सोशल मीडिया व इतर माध्यमांमधून समोर येत आहेत.

चीनच्या या कठोर निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्याही धास्तावल्या असून सॅमसंग व मायक्रॉन टेक्नॉलॉजीस्‌‍पाठोपाठ फोक्सवॅगन व टोयोटासारख्या कंपन्यांनी काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचे परिणाम जागतिक पुरवठा साखळी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येतील, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो.

leave a reply