पाकिस्तान चीनला धक्का देण्याच्या तयारीत

- पाकिस्तानी विश्‍लेषकांचा आरोप

इस्लामाबाद – चिनी अ‍ॅप ‘टिकटॉक’वर पाकिस्तानने बंदी टाकली आहे. याआधीही तीन वेळा पाकिस्तानने चुकीचा कंटेट दिला जात असल्याचा ठपका ठेवून या चिनी अ‍ॅपवर अशी कारवाई केली होती. मात्र आपल्या नऊ इंजिनिअर्सच्या हत्येमुळे चीन पाकिस्तानवर संतापलेला असताना, टिकटॉकवर बंदी टाकण्याचा पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय निराळेच संकेत देत आहे. चीनबरोबरील मैत्रीचे पाकिस्तानने कितीही मोठे दावे केले, तरी प्रत्यक्षात पाकिस्तान चीनचा विश्‍वासघात करण्याच्या तयारीत असल्याचा दावा या देशातील माध्यमेच करीत आहेत. त्यामुळे चीन पाकिस्तानवर अतिशय संतापलेला आहे व याचे परिणाम लवकरच दिसतील, अशी चिंता पाकिस्तानची ही माध्यमे व्यक्त करीत आहेत.

पाकिस्तान चीनला धक्का देण्याच्या तयारीत - पाकिस्तानी विश्‍लेषकांचा आरोपपाकिस्तानच्या कोहिस्तानमध्ये नऊ चिनी इंजिनिअर्सची हत्या घडविणारा बॉम्बस्फोट झाला होता. मात्र हा घातपात नसल्याचा दावा करून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतचा संशय अधिकच वाढविला. कालांतराने हा दहशतवादी हल्ला होता, हे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले खरे. पण यानंतर खवळलेल्या चीनने पाकिस्तानवर आपला विश्‍वास राहिलेला नाही, असे स्पष्ट संकेत दिले. या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी चीनने पाकिस्तानात पथक रवाना केले. तसेच ज्या दासू धरण प्रकल्पावर हे इंजिनिअर्स काम करीत होते, तो प्रकल्पच सध्या चीनने बंद करून टाकला. इतकेच नाही तर पाकिस्तानला चिनी नागरिकांची सुरक्षा करता येत नसेल, तर चीन आपले जवान व क्षेपणास्त्रे पाकिस्तानात तैनात करायला तयार आहे, असा इशारा देखील चीनने दिला होता.

यानंतर चीनची मनधरणी करण्यासाठी पाकिस्तानची धांदल उडली. पण पाकिस्तानातील काहीजण कोहिस्तानमधील या बॉम्बस्फोटाकडे संशयाने पाहत आहेत. ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर-सीपीईसी’ प्रकल्पाद्वारे चीन पाकिस्तानात करीत असलेली गुंतवणूक, हे पाकिस्तानचे भवितव्य ठरते. पुढच्या काळात पाकिस्तान चीनवरच अवलंबून राहिल. असे असताना, पाकिस्तान चीनबरोबरील संबंधांना महत्त्व देत नाही, याचे कारण अतिशय वेगळे असल्याचा आरोप पाकिस्तानच्या विश्‍लेषकाने केला.

पाकिस्तानची सत्तासूत्रे हाती असलेल्या काही मूठभर मंडळींचे हितसंबंध अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांमध्ये गुंतलेले आहेत. अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देशांना ‘सीपीईसी’ प्रकल्प मान्य नाही. म्हणूनच ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत आणि पाकिस्तानातील ही मूठभर मंडळी चीनच्या विरोधात कारस्थाने आखत आहेत, अशी मांडणी एका पाकिस्तानी विश्‍लेषकाने केली. सध्या पाकिस्तानने चीनचा हात सोडून पुन्हा अमेरिकेचा हात पकडण्याची तयारी केली आहे. हा चीनचा विश्‍वासघात ठरतो, याची जाणीव झाल्यामुळेच चीन पाकिस्तानवर संतापलेला आहे. चीनच्या संतापाची पाकिस्तानला पुरेशी जाणीव झालेली नाही, असा दावा या विश्‍लेषकाने केला.

या पार्श्‍वभूमीवर, टिकटॉकसारख्या चिनी अ‍ॅपवर पाकिस्तानने टाकलेल्या बंदीमागे निराळेच राजकारण असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. एकीकडे पाकिस्तानी नेते चीनबरोबरील आपल्या देशाची मैत्री हिमालयाहूनही उंच असल्याचे दावे ठोकत आहेत. तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात चीनबरोबर अमेरिका देखील गुंतवणूक करू शकेल, असे संदेश देत आहेत. अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांच्या गुंतवणुकीचे पाकिस्तानने स्वागतच करायला हवे, असे या माजी लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. चीनबरोबर अमेरिकेचीही गुंतवणूक स्वीकारून पाकिस्तानने आता तटस्थ भूमिका स्वीकारावी. अमेरिका किंवा चीन यापैकी एकाची निवड करण्याची चूक पाकिस्तानने केलीच, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतील. त्यापेक्षा या दोन्ही देशांनाही गुंतवणुकीची संधी देऊन, पाकिस्तानात या दोन्ही देशांच्या हितसंबंधांची टक्कर घडवून आणण्याचा सल्ला या माजी लष्करी अधिकार्‍याने दिला आहे.

चीन कितीही महत्त्वाचा देश असला तरी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासह महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांवर प्रभाव असलेल्या अमेरिकेची जागा चीन इतक्यात घेऊ शकत नाही. पाकिस्तानला अमेरिकेचे म्हणणे मान्य करण्यावाचून पर्याय नाही, याची जाणीव पाकिस्तानच्या लष्कराला झालेली आहे, असे पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. मात्र चीनबरोबरील विकासप्रकल्प आणि गुंतवणूक इतक्या पुढे गेल्यानंतर, पाकिस्तानने यापासून माघार घेतली, तर तो भयंकर विश्‍वासघात ठरेल. याची जबर किंमत चीन पाकिस्तानकडून वसूल करील, अशी चिंता दुसर्‍या गटाचे पत्रकार आणि विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply