अफगाणिस्तानच्या लष्कराला पाकिस्तानची धमकी

- अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आरोप

धमकीकाबुल – अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील स्पिन बोल्दाक चौकी तालिबानच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न अफगाणी लष्कराने केला, तर पाकिस्तानचे हवाई दल अफगाणी लष्करावर हल्ले चढविल, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी हा आरोप केला. हा आरोप सिद्ध करणारे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगून उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची तयारी केली आहे. यामुळे तालिबानशी आपला संबंध नसल्याचा दावा करणार्‍या पाकिस्तानचे पितळ उघडे पडू शकेल.

दोन दिवसांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातील पाकिस्तान सीमजवळील स्पिन बोल्दाक चौकीचा ताबा घेतला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्पिन बोल्दाक-चमन ‘फ्रेंडशिप गेट’वरील अफगाणी राष्ट्रध्वज काढून तालिबानचा ध्वज फडकवला आहे. अफगाण-पाकिस्तानातील व्यापारी वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या स्पिन बोल्दाक सीमेवरील तालिबानचे नियंत्रण धोकादायक ठरते. धमकीकारण व्यापारी वाहतूकीद्वारे मिळणार्‍या जकातावर तालिबानचे दहशतवादी आपली तिजोरी भरून घेतील व अफगाणी सरकारविरोधात वापर करतील, अशी भीती व्यक्त केली जाते. तसेच या सीमेवरून तालिबानचे दहशतवादी अंमली पदार्थांची तस्करी सुरू करू शकतात.

या पार्श्‍वभूमीवर, ही चौकी व आसपासच्या शहरावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी अफगाणी लष्कराने धमकीकारवाई सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. पण तालिबानचा समर्थक असलेल्या पाकिस्तानने अफगाणी लष्कराला धमकावल्याचा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी केला. ‘स्पिन बोल्दाक चौकीवरुन तालिबानला पिटाळण्यासाठी अफगाण लष्कर आणि हवाईदलाने थोडीशी जरी हालचाल केली तर पाकिस्तानी हवाईदलाच्या कारवाईला सामोर जावे लागेल, अशी धमकी पाकिस्तानने दिली’, असा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी केला.

‘अफगाणी विमानांनी स्पिन बोल्दाकपासून 10 किलोमीटर दूर रहावे. अन्यथा पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा सामना करावा लागेल, असेही पाकिस्तानच्या हवाईदलाने धमकावले. पाकिस्तानचे हवाईदल तालिबानचे संरक्षण करीत आहे, या आरोपांचे समर्थन करणारे पुरावे आपल्याकडे आहेत’, असे सालेह यांनी सोशल मीडियावरुन जाहीर केले. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्यावरील आरोप फेटाळले. यावरही अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला फटकारले.

धमकी‘गेली वीस वर्षे पाकिस्तान अशाच प्रकारे तालिबानचे नेते आणि क्वेट्टा शूरा या तालिबानच्या संघटनेचे आपल्या देशातील अस्तित्व देखील नाकारत आहे. असे आरोप झाल्यानंतर पाकिस्तान आधी लिहिलेलेच परिच्छेद नव्याने वाचून दाखविण्याचे काम करतो, हे अफगाणिस्तान आणि पाश्‍चिमात्य देशांना चांगलेच ठाऊक आहे’, अशा शब्दात उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. दरम्यान, पाकिस्तानच्या धमक्यांची पर्वा न करता अफगाणी लष्कराने स्पिन बोल्दाकवर नियंत्रण मिळविण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत. अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानचे काही दहशतवादी ठार झाले तर काहींना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ताब्यात घेतलेल्या तालिबानींमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना तालिबानसह अफगाणिस्तानात संघर्ष करीत असल्याच्या बातम्या याआधीही प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply