पाकिस्तान अमेरिकेला लष्करी तळ देऊन नवी चूक करणार नाही

- पंतप्रधान इम्रान खान यांची घोषणा

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या ‘वॉर ऑन टेरर’मध्ये सहभागी होऊन पाकिस्तानने फार मोठी चूक केली आणि त्याची जबर किंमत मोजली, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. पण आता मात्र पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्त्वाशी तडजोड करून अफगाणिस्तानातील कारवाईसाठी अमेरिकेला तळ देण्याची चूक करणार नाही, असेही इम्रान खान यांनी ठासून सांगितले. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी केलेले हे भाषण चांगलेच गाजत आहे. काही पाकिस्तानी विश्‍लेषकांनी यासाठी इम्रान खान यांचे कौतुक सुरू केले. मात्र यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही व यासाठी पाकिस्तान तयार आहे का, असा प्रश्‍न या देशातील माध्यमे विचारू लागली आहेत.

पाकिस्तान अमेरिकेला लष्करी तळ देऊन नवी चूक करणार नाही - पंतप्रधान इम्रान खान यांची घोषणाएका चिनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपला देश अमेरिकेच्या नाही, तर चीनच्या बाजूने उभा राहणार असल्याचे जाहीर करून टाकले होते. पाकिस्तानने चीनबरोबरील सहकार्य तोडून टाकावे यासाठी अमेरिका दडपण टाकत आहे, पण पाकिस्तान तसे करायला तयार नाही, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इम्रान खान यांनी अमेरिका हा पाकिस्तानचा मित्रदेश नसल्याचे सांगून पाकिस्तानने विनाकारण अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवला. तसेच अल कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून कारवाई केली, यावरही इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली.

अल्ताफ हुसेन या लंडनमध्ये असेलल्या पाकिस्तानी नेत्याचा उल्लेख दहशतवादी असा करून, याला ठार करण्यासाठी ब्रिटन पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची परवानगी देईल का? असा प्रश्‍न इम्रान खान यांनी संसदेत विचारला. तसेच अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील युद्धात सहभागी होऊ नका, असे सांगणार्‍या काही मोजक्या नेत्यांमध्ये आपण होतो, पण त्यावेळी आपली ‘तालिबान खान’ म्हणून संभावना करण्यात आली, याची आठवण इम्रान खान यांनी करून दिली. पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी अमेरिकेच्या दडपणाखाली येऊन केलेल्या चुकीची आपण पुनरावृत्ती करणार नाही, असे सांगून इम्रान खान यांनी अमेरिकेला लष्करी तळ देणार नसल्याचे घोषित करून टाकले. त्यांचे हे भाषण पाकिस्तानातील कट्टरपंथिय विश्‍लेषक व पत्रकारांनी उचलून धरले. अमेरिकेला पहिल्यांदाच एका पाकिस्तानी नेत्याने आत्मविश्‍वासपूर्ण उत्तर दिल्याचे या कट्टरपंथियांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीही इम्रान खान यांच्या या निर्णयाचे समर्थन केले. मात्र अमेरिकेकडून याची प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही, याची जाणीव हे माजी अधिकारी करून देत आहेत. पुढच्या काळात अमेरिका पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करील, एफएटीएफ तसेच इतर संस्थांवरील आपल्या प्रभावाचा वापर करून पाकिस्तानला जेरीस आणल्यावाचून राहणार नाही, असे या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत चीन, रशिया व इराण या देशांबरोबरील सहकार्य वाढवून पाकिस्तानने अमेरिकेच्या दडपणाचा मुकाबला करण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला या अधिकार्‍यांनी दिला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी याची तयारी केली असून गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांनी चीनची केलेली वारेमाप स्तुती हेच दाखवून देत आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या विरोधात आपल्याला रशिया नक्कीच सहकार्य करील, असा विश्‍वास पाकिस्तानला वाटू लागला आहे. मात्र अमेरिकेसारख्या महासत्तेचे दडपण झुगारून देणे इतके सोपे नाही, याची जाणीव पाकिस्तानल्या काही समंजस पत्रकारांना आहे. याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील आणि ते सहन करण्यासाठी लागणारी आर्थिक व राजकीय पातळीवरील क्षमता पाकिस्तानकडे नाही, याकडेही हे पत्रकार लक्ष वेधत आहेत.

leave a reply