‘धडा’ विसरून अवघ्या काही तासात पाकिस्तानने भारताला दिलेला चर्चेचा प्रस्ताव मागे घेतला

चर्चेचा प्रस्तावइस्लामाबाद – भारताबरोबरील तीन युद्धांनंतर पाकिस्तानला योग्य तो धडा मिळालेला आहे, असा दावा करून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला खरा. पण या युद्धांना काही दशके उलटल्यानंतर पाकिस्तानला मिळालेल्या या धड्याचे शहाणपण काही तास देखील टिकू शकले नाही. कारण पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने केलेली घोषणा याची साक्ष देत आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू केल्याखेरीज पाकिस्तान चर्चा करणार नाही, असे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पाकिस्तानकडून हा खुलासा येण्याच्या आधीच भारतीय विश्लेषकांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या शब्दावर विश्वास ठेवता येणार नाही, असे बजावले होते. तर भारताकडून प्रतिसाद न आल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपला बचाव करण्यासाठी घुमजाव करावे लागले, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून भारताला चर्चेचा प्रस्ताव देण्याच्या आधी, पाकिस्तानच्या सरकारने काही बातम्या माध्यमांमध्ये सोडल्या होत्या. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पाकिस्तानच्या आयएसआयच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचे दावे करणाऱ्या बातम्यांचाही समावेश होता. भारताचे पंतप्रधान पाकिस्तानचा दौरा करतील, असे या चर्चेत ठरले होते, अश ी माहिती पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी दिली होती. तसे दावे पाकिस्तानच्या माध्यमांनी केले होते. पण दोन्ही देशांमधील ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही, असा दावा पाकिस्तानातील काही पत्रकार व वृत्तसंस्थांनी केला. या बातम्यांचा वापर करून भारताबरोबरील चर्चेसाठी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न पाकिस्तानने केला व त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्याला धडा मिळाल्याची विधाने केली होती.

मात्र पंतप्रधान शरीफ यांनी दिलेल्या विधानांकडे भारताने फारसे लक्ष दिले नाही. सध्याच्या स्थितीत कंगाल झालेल्या पाकिस्तानसमोर भारताशी चर्चा करण्याखेरीज दुसरा पर्यायच राहिलेला नाही, याची जाणीव भारताला झालेली आहे. त्याचवेळी पाकिस्तानवर विश्वास ठेवण्याची नवी चूक करण्यास भारत तयार नाही. हे लक्षात आल्यानंतर आपल्या विधानांवर सारवासारव करून वेळ मारून नेण्याची वेळ पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर ओढावली. म्हणूनच पंतप्रधान कार्यालयाने कलम 370चे कारण पुढे करून हे कलम लागू झाल्याखेरीज भारताशी चर्चा शक्य नसल्याचे जाहीर केले.

मात्र पंतप्रधान शरीफ यांनी केलेल्या या विधानांवर भारतापेक्षाही पाकिस्तानात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकण्याची तयारी केली, हे दाखवून देणारे असल्याची नाराजी पाकिस्तानातील काही विश्लेषकांनी व्यक्त केली. तर काहीजणांनी भारताकडून आपल्या देशाला सहाय्य हवे आहे, म्हणून पंतप्रधान शरीफ तडजोड करण्यासाठी तयार झाले, असा दावा करीत आहेत. पण आज नाहीतर उद्या पाकिस्तानला भारताबरोबरील संबंध सुधारावेच लागतील, त्याखेरीज तरणोपाय नाही, असे सांगणारा पत्रकार व विश्लेषकांचा गट पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये आपली भूमिका मांडत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळवण्यात भारताला यश आले असून सध्याच्या घडीला कुठलाही महत्त्वाचा देश भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अशा स्थितीत पाकिस्तानला भारताशी संबंध तोडून वाटचाल करता येणार नाही, असा दावा पाकिस्तानी वायुसेनेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या अग्रगण्य दैनिकामध्ये लेख लिहून त्यांनी आपल्या देशाच्या बुद्धिमंत तसेच विश्लेषकांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

English हिंदी

leave a reply