भारताने ‘हायब्रिड वॉर’ छेडल्याचा पाकिस्तानच्या मंत्र्यांचा आरोप

इस्लामाबाद – ‘‘भारताने पाकिस्तानच्या विरोधात अघोषित ‘हायब्रिड वॉर’ छेडले आहे. याला तोंड देण्यासाठी पाकिस्तानच्या तरुणांनी सज्ज व्हावे’’, असे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी जाहीर केले. पाकिस्तानातील अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्लाह अलीखली यांची मुलगी सिलसिला हिचे इस्लामाबादमधून अपहरण झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचे सोडून हे अफगाणिस्तान व भारताने मिळून घडवून आणलेले अपहरणनाट्य असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानातील आपल्या राजदूत व राजनैतिक कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावून घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे पडसाद उमटू लागल्यानंतर, पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी या सार्‍या प्रकरणामागे भारताचे ‘हायब्रिड वॉर’ असल्याचा दावा ठोकला आहे.

भारताने ‘हायब्रिड वॉर’ छेडल्याचा पाकिस्तानच्या मंत्र्यांचा आरोपअफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे अपहरण झाले व अपहरणकर्त्यांनी तिचा छळ केल्याचे उघड झाले होते. मात्र असे अपहरण झालेले नाही, असे दावे करून पाकिस्तानने अफगाणिस्तानला चिथावणी दिली होती. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानातील राजदूत व राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशी बोलावून घेतले असून दोन्ही देशांचे संबंध यामुळे विकोपाला गेल्याचे स्पष्ट होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळले व अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी अफगाणी राजदूतांच्या मुलीबद्दल केलेली शेरेबाजी कुणीही खपवून घेऊ शकत नाही, अशी टीका पाकिस्तानचेच पत्रकार करीत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानच्या कोहिस्तानमध्ये झालेल्या घातपातात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार झाल्यानंतर इम्रान खान यांच्या सरकारकडे अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची कुवत आहे का? असा प्रश्‍न पाकिस्तानातच उपस्थित करण्यात येत होता.

भारताने ‘हायब्रिड वॉर’ छेडल्याचा पाकिस्तानच्या मंत्र्यांचा आरोपमात्र या दोन्ही घटनांसाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप करून पाकिस्तानचे सरकार आपला बचाव करीत आहे. पाकिस्तान व चीनची हिमालयाहूनही अधिक उंच असलेली मैत्री भारताला नको आहे. इम्रान खान यांचे प्रभावी नेतृत्त्व भारत व इस्रायल या देशांना अस्वस्थ करीत आहे. म्हणूनच पाकिस्तान आणि चीनमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी कारस्थाने आखली जात आहेत, असा आरोप शेख रशिद यांनी केला. एफएटीएफच्या बैठकीला एक दिवस असताना, लाहोरमधील हफीज सईदच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाला. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी ‘जॉईंट कोऑर्डिनेशन कमिटी-जेसीसी’ची बैठक होण्याच्या एक दिवस आधी दासू येथे बॉम्बस्फोट झाला व त्यात चिनी इंजिनिअर्सचा बळी गेला. अफगाणिस्तानविषयक परिषदेचे पाकिस्तानने आयोजन केल्यानंतर, अफगाणी राजदूतांच्या मुलीचे इस्लामाबादमधून अपहरण झाले. या सार्‍या गोष्टींमागे पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय कट आहे, असे सांगून ‘हायब्रिड वॉर’चा दाखला शेख रशिद यांनी दिला.

पाकिस्तानची सुरक्षा हातळण्यात आलेल्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्यापेक्षा पाकिस्तानने तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांना सहाय्य पुरविण्याचे थांबवावे, असा सल्ला पाकिस्तानचेच पत्रकार आपल्या सरकारला देत आहेत. तसेच अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेला लष्करी तळ देणार नाही, असे ठासून सांगणार्‍या पाकिस्तानला वेगवेगळ्या मार्गाने याची किंमत चुकती करावी लागत आहे, याची जाणीव हे पत्रकार करून देत आहेत. पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने स्वीकारलेल्या आत्मघातकी धोरणांचे परिणाम पाकिस्तानसमोर येत आहेत, अशी खरमरीत टीका हे पत्रकार करीत आहेत.

leave a reply