पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ म्यानमारमध्ये सक्रीय

- युरोपियन अभ्यासगटाचा दावा

ब्रुसेल्स – पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ म्यानमारमध्ये सक्रीय असल्याचा दावा ब्रुसेल्सस्थित ‘साऊथ आशिया डेमोक्रॅटिक फोरम’ या अभ्यासगटाने केला. तिसऱ्या देशातून सीमेपलीकडील दहशतवादाचा वापर करुन पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तानात अस्थैर्य माजविण्याचा कट आखला असल्याचा इशारा, या अभ्यासगटाने दिला आहे. याआधीही भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारमधील दहशतवादी गटांना चीन आणि पाकिस्तानकडून सहाय्य मिळत असल्याचे उघड झाले होते. तसेच म्यानमारच्या सीमेजवळ चिनी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

pakistans-isi-active‘आयएसआय’ म्यानमारमधील दहशतवादी गटांना भारतविरोधी कारवायांसाठी प्रशिक्षण देत आहे. बांगलादेशमधल्या ‘जमात उल- मुजाहिद्दीन’च्या सहाय्याने रोहिंग्याना यासाठी तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. या संघटनेने ढाकामध्ये दहशतवादी हल्ला चढविला होता. पाकिस्तान, बांगलादेशच्या या दहशतवादी संघटनेच्या मदतीने भारत अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण बांगलादेश ते होऊ देणार नाही, असे आश्वासन बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले होते.

पाकिस्तान म्यानमारचा वापर करुन भारत आणि अफगाणिस्तान अस्थिर करीत आहे. यावरून पाकिस्तान दहशतवाद्यांना सहाय्य करतो हे नव्याने पुराव्यानिशी समोर आले आहे, असे या अभ्यासगटाच्या विश्लेषकांनी म्हटले. तसेच ‘आराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी’ बांगलादेश-म्यानमार सीमेवर सक्रीय झाली आहे. या गटाचा प्रमुख पाकिस्तानचा असून याला पाकिस्तान तालिबान सहाय्य करते, असेही समोर आले होते. या अभ्यासगटाच्या अहवालाच्या निमित्ताने नव्याने ही बाब समोर आली आहे.

isi-active

दरम्यान, भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारमधील दहशतवादी गटांना चीन आणि पाकिस्तानचे सहाय्य मिळत असल्याचे उघड झाले होते. चीनने ‘आयएसआय‘च्या मदतीने हे जाळे उभारले असून भारताच्या हितसंबधांना धोका पोहोचणे, हे त्याचे प्रमुख लक्ष्य आहे. काही आठवड्यांपूर्वी म्यानमार सीमेजवळील थायलंडच्या एका शहरात चिनी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यावेळी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानचे दहशतवादीही होते. तसेच म्यानमारने यापूर्वी २२ दहशतवाद्यांना भारताकडे सोपविले होते. पाकिस्तान व चीन म्यानमारच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करीत असताना, भारत आणि म्यानमारमधील हे वाढते सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

leave a reply