पॅसिफिक महासागरातील ‘पलाऊ’ने चीनच्या घुसखोर बोटी ताब्यात घेतल्या

- २८ मच्छिमार व खलाशांना अटक

पलाऊ/बीजिंग – पॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘आयलंड कंट्री’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘पलाऊ’ने चीनच्या मच्छिमार बोटींसह खलाशांना ताब्यात घेतले आहे. चीनच्या बोटी पलाऊच्या सागरी हद्दीत घुसून मच्छिमारी करीत होत्या, असा आरोप पलाऊच्या यंत्रणांनी केला. पलाऊ हा तैवानला मान्यता देणार्‍या मोजक्या देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो. त्यामुळे ही कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

चीनच्या मच्छिमारी बोटींच्या ताफ्याने यापूर्वी ‘साऊथ चायना सी’ तसेच ‘ईस्ट चायना सी’ मध्ये इतर देशांच्या सागरी क्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या मच्छिमारी बोटींना चीनचे तटरक्षक दल तसेच नौदलाचीही साथ असून असा ताफा ‘नेव्हल मिलीशिआ’ म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. आपल्या हद्दीबाहेरील सागरी क्षेत्रांवर हक्क सांगण्याचे माध्यम म्हणून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून याचा वापर होत असल्याचे दावे विविध अभ्यासगट व विश्‍लेषकांकडून करण्यात आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी चीनच्या २५० हून अधिक मच्छीमारी बोटींचा ताफा पॅसिफिक महासागरातील संरक्षित ‘गॅलापॅगोस आयलंडस्’ भागात धोकादायकरित्या वावरत असल्याचे आढळले होते. या मुद्यावर अमेरिकेसह लॅटिन अमेरिकेतील देशांनी आक्रमक भूमिका घेतली होती. २०१७ साली चीनचे एक मोठे मच्छिमार जहाजही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पलाऊच्या सागरी हद्दीत चीनच्या मच्छिमारी बोटींकडून घुसखोरी होण्याची पहिलीच घटना समोर आली आहे.

पलाऊच्या ‘मरिन लॉ अ‍ॅण्ड एन्फोर्समेंट डिव्हिजन’ने चीनच्या सात बोटी हेलेन रीफ या भागातून जप्त केल्या आहेत. यात एका मोठ्या मच्छिमार बोटीसह सहा छोट्या बोटींचा समावेश आहे. चिनी बोटींवरून २८ मच्छिमार व खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त बोटीवरील ‘सी कुकुंबर’ व इतर सामानही जप्त केल्याची माहिती पलाऊकडून देण्यात आली.

पलाऊ हा पश्‍चिम पॅसिफिक क्षेत्रातील अत्यंत छोट्या आकाराचा देश असून या देशाची लोकसंख्या १८ हजार इतकी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तैवानला मान्यता देणार्‍या मोजक्या देशांमध्ये या ‘आयलंड कंट्री’चा समावेश होतो. काही महिन्यांपूर्वी या देशाने अमेरिकेला आपल्या भागात संरक्षणतळ उभारण्याची विनंतीही केली होती. सध्या या देशाला ऑस्ट्रेलियाकडून आर्थिक व सुरक्षाविषयक सहाय्य पुरविण्यात येते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॅटिन अमेरिकेनजिकच्या सागरी क्षेत्रात चिनी मच्छिमारी बोटींचा ताफा आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. लॅटिन अमेरिकेतील चिलीच्या सागरी हद्दीनजिक हा ताफा वावरत असून चिलीने आपल्या युद्धनौका व गस्तीनौका टेहळणीसाठी पाठविल्याची आहेत. आपल्या सागरी क्षेत्रानजिक बेकायदशीर कारवाया खपवून घेणार नसल्याचा इशाराही चिलीकडून देण्यात आला आहे.

leave a reply