इस्रायलमधील हॉलोकॉस्टसंबंधी कार्यक्रमामध्ये पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचा सहभाग

जेरूसलेम – दुसऱ्या महायुद्धात झालेल्या ज्यूधर्मियांच्या वंशसंहाराची माहिती देण्याऱ्या कार्यक्रमात पाकिस्तानचे शिष्टमंडळ देखील सहभागी झाले. दुसऱ्या महायुद्धात होलोकॉस्ट अर्थात ज्यूधर्मियांचा वंशसंहार झालाच नाही, हा सहानुभूती मिळविण्यासाठी ज्यूधर्मियांनीच आखलेला कट असल्याचे दावे पाकिस्तानात केले जातात. इस्रायलचे अस्तित्त्व न मानणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असून पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्रायलसाठी अवैध अशी ओळ छापलेली असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानने इस्रायलला मान्यता देऊन संबंध सुधारावे, अशी मागणी सुरू झाली आहे. याला कडाडून विरोध केला जात असला तरी पाकिस्तान या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. इस्रायलमधील कार्यक्रमाला पाकिस्तानच्या शिष्टमंडळाची उपस्थिती हेच संकेत देत आहे.

इस्रायलमधील हॉलोकॉस्टसंबंधी कार्यक्रमामध्ये पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचा सहभागशराका नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने होलोकॉस्टबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये पाकिस्तानातील धार्मिक नेते, बुद्धिमंत, पत्रकार व काही मान्यवरांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला. होलोकॉस्टबद्दल पाकिस्तानात फार मोठे गैरसमज आहेत, अशी कबुली या शिष्टमंडळात सहभागी झालेल्या एका पाकिस्तानी पत्रकाराने दिली. तसेच पाकिस्तानात ज्यूधर्मियांबद्दल असहिष्णूतेची भावना असल्याचेही या पत्रकाराने मान्य केले.

अजूनही पाकिस्तान व इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. पण यासाठी दोन्ही देशांकडून अधूनमधून प्रयत्न केले जातात. विशेषतः परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असताना, त्यांनी यासाठी पावले उचलल्याचे उघड झाले होते. पण पाकिस्तानातील कट्टरवाद्यांनी मुशर्रफ यांना विरोध करून हे प्रयत्न हाणून पाडले होते. पुढच्या काळात इम्रान खान यांच्या सरकारनेदेखील यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळीही त्यांना कडवा विरोध झाला होता.

होलोकॉस्टसंबंधातील कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळावरही या देशातून जोरदार टीका सुरू झाल्याचे दिसत आहे. इस्रायलबरोबर पाकिस्तानचे नेते छुप्यारितीने हातमिळवणी करीत असल्याचा आरोप या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाला आहे.

हिंदी English

 

leave a reply