तेहरान – निदर्शनांच्या माध्यमातून दहशतवाद आणि गृहयुद्ध पेटवून इराणचे विभाजन करण्याचा कट आखला होता. यासाठी अमेरिका आणि इस्रायलने दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे देखील पुरविली. पण इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी हा डाव हाणून पाडल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी केला. हे आरोप निराधार नसून यासंबंधीची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. याआधी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशातील अस्थैर्यामागे सौदी अरेबियाचा हात असल्याचा आरोप केला होता.
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिल्यानंतर इराणमधील निदर्शनांचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. इराण मानवाधिकारांचे उल्लंघन करून निदर्शकांवर कारवाई करीत असल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देशांनी केले आहेत. तर संयुक्त राष्ट्रसंघाने इराणमधील निदर्शनांची पाहणी करण्यासाठी आपले अधिकारी रवाना करण्याचे जाहीर केले. आपल्या मानवाधिकार पथकाला इराणने परवानगी द्यावी, असे आवाहन राष्ट्रसंघाने केले आहे. याला प्रतिसाद न देता इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व मित्रदेशांवरच गंभीर आरोप केले.
‘इराणचे तुकडे करणे हे शत्रूदेशांचे अंतिम उद्दिष्ट आहे. शत्रूदेशांना इराणमध्ये दहशतवादी हल्ले चढवून गृहयुद्धात ढकलायचे आहे’, असा ठपका इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी ठेवला. अमेरिका व युरोपमधील काही देशांच्या प्रतिनिधींनी निदर्शनांचा हवाला देऊन, इराणमधील राजवट उलथण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले होते, याची आठवण इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करुन दिली. शत्रूदेशांच्या या कटाची कागदपत्रे इराण सरकारकडे असल्याचा दावा आमिर अब्दुल्लाहियान यांनी केला.
‘जगाच्या इतिहासात सर्वाधिक काळ मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचा काळाकुट्ट इतिहास असलेल्या व इतर देशांचे शोषण करणाऱ्या अमेरिका आणि युरोपिय देशांनी इराणला मानवाधिकारांचे महत्त्व सांगू नये’, अशी चपराक इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावली. इराणमध्ये नेमके काय सुरू आहे, याचे अमेरिका, इस्रायल आणि ई३ देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीला अजिबात कल्पना नाही. म्हणूनच हे देश अशी बेताल विधाने करीत असल्याचे ताशेरे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ओढले.
इराणमधील निदर्शकांच्या हल्ल्यांमध्ये सुरक्षदलांच्या ५० हून अधिक जवानांची धारदार हत्यारांनी आणि बंदुकीने हत्या केल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियान यांनी केला. इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातून या दहशतवाद्यांना शस्त्रसज्ज करून इराणमध्ये त्यांची घुसखोरी घडविली जाते. इराकमध्ये असे ७६ दहशतवादी असून अमेरिका व इस्रायलकडून त्यांना शस्त्रास्त्रे पुरविली जात असल्याचा गंभीर आरोप इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन इराकच्या नेत्यांनी केले आहे, असा विश्वास अब्दुल्लाहियान यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या निदर्शनांमुळे इराणच्या राजवटीला आव्हान मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यातच इराण निदर्शकांवर करीत असलेल्या कारवाईचा निषेध करून अमेरिकेने इराणच्या अधिकाऱ्यांवर नवे निर्बंध जाहीर केले आहेत.
हिंदी