लष्करामुळे नाही, राजकीय अपयशामुळे ७१ साली पाकिस्तानचा पराभव झाला

पाकिस्तानच्या मावळत्या लष्करप्रमुखांचा बचाव

इस्लामाबाद – बेहिशेबी संपत्ती आणि गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र हे निरोपाचे भाषण देत असताना, जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या लष्करावर केल्या जाणाऱ्या टीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या लष्कराने आत्तापर्यंत राजकीय हस्तक्षेप केला, याची कबुलीही जनरल बाजवा यांनी दिली व यासाठीच पाकिस्तानी लष्कर टीकेचा विषय बनल्याचेही त्यांनी मान्य केले. याबरोबरच ७१ सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला, यामागे पाकिस्तानी लष्कराचे नाही तर राजकीय व्यवस्थेचे अपयश होते, असा दावा जनरल बाजवा यांनी केला.

General Qamar Javed Bajwaपाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. स्वतः बाजवा यांनी ही बाब जाहीर केली असली तरी याआधी त्यांनी मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केल्याचे आरोप झाले होते. किमान सहा महिन्यांची मुदतवाढ मिळविण्यासाठी जनरल बाजवा यांनी प्रयत्नांची शर्थ केल्याचा ठपका पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. जनरल बाजवा लष्करप्रमुखपदावर आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याची बाब अहमद नुरानी नावाच्या पत्रकाराने उघड केली. या पत्रकाराने ही माहिती उघड करताना जनरल बाजवा व त्यांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधून त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे केले जातात. मात्र त्यांना जनरल बाजवा व त्यांच्या नातेवाईकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. पण या गैरव्यवहाराची माहिती उघड करणाऱ्या पाकिस्तानी वृत्तवाहिनीचे प्रसारण काही काळासाठी बंद पडल्याने, याबाबतचा संशय अधिकच वाढला आहे.

यामुळे जनरल बाजवा यांच्यासह पाकिस्तानी लष्करावर होणाऱ्या टीकेची तीव्रता अधिकच वाढली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने लोकनियुक्त सरकार अनेकवार उलथले आणि सत्ता ताब्यात घेतल्यानेच देशाची ही अवस्था झाल्याची टीका माध्यमांमधून होत आहे. तसेच पाकिस्तानी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लष्करी अधिकाऱ्यांकडून केला जाणारा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका काही पत्रकार ठेवत आहेच. जनरल बाजवा यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ हे त्याचे अगदी ताजे उदाहरण ठरते, असा दाखला हे पत्रकार देत आहेत. यामुळे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणाऱ्या इम्रान खान व त्यांच्या समर्थकांचे बळ अधिकच वाढल्याचे दिसते. मात्र हे पत्रकार इम्रान खान यांनीही सत्तेवर येण्यासाठी लष्कराचे सहाय्य घेतले होते, याकडे लक्ष वेधत आहेत.

अशा परिस्थितीत जनरल बाजवा लष्करप्रमुखपदावरून खाली उतरताना आपला बचाव करणारे भाषण ठोकून सहानुभूती कमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषत ७१ सालच्या युद्धात पाकिस्तानच्या लष्कराने फार मोठा पराक्रमक केल्याचा दावा करून जनरल बाजवा पाकिस्तानी लष्करावरील सर्वात मोठ्या आक्षेपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनरल बाजवा यांच्याच कार्यकाळात पाकिस्तानच्या लष्करामध्ये फूट पडली असून लष्करी अधिकाऱ्यांमधील मतभेद वाढत चालल्याची तक्रार होत आहे. याचे गंभीर परिणाम पाकिस्तानच्या सुरक्षेवर होतील, असा दावा केला जातो.

leave a reply