पंतप्रधान जॉन्सन यांच्या राजीनाम्याने ब्रिटनमध्ये गोंधळ

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी ‘कंझर्व्हेटिव्ह पार्टी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पक्षांतर्गत नाराजी आणि सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे जॉन्सन यांना हा निर्णय घ्यावा लागला. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीकडून पक्षाध्यक्षाची घोषणा होईपर्यंत पुढील काही दिवस जॉन्सन ब्रिटनचे हंगामी पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळणार आहेत.

boris-johnsonगेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान जॉन्सन टीकेचे लक्ष्य ठरत होते. काही वादग्रस्त निर्णयामुळे जॉन्सन यांच्या सरकारमधील कॅबिनेटपदाच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू केले होते. यामध्ये अर्थमंत्री रिषी सुनाक, आरोग्यमंत्री साजिद जावेद यांचाही समावेश होता. त्यामुळे जॉन्सन यांनी पक्षसहकाऱ्यांचा विश्वास गमावल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत, गुरुवारी जॉन्सन यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

बोरिस जॉन्सन यांच्या या राजीनाम्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिका व ब्रिटन मित्र आणि सहकारी देश आहेत. हे विशेष संबंध यापुढेही सुरळीत सुरू राहतील, असे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जॉन्सन यांचा उल्लेख करण्याचे टाळले. दरम्यान, पंतप्रधानपदासाठी रिषी सुनाक, टॉम टगनहॅट, नदिम झहावी यांच्या नावाची चर्चा आहे.

leave a reply