पंतप्रधानांच्या हस्ते देशात ‘5जी’ सेवेचा शुभारंभ

नवी दिल्ली – ‘‘आज 130 कोटी भारतीयांना देशाकडून आणि देशाच्या दूरसंचार उद्योगाकडून 5जीच्या स्वरुपात एक अद्भूत भेट मिळाली आहे. भारत आतापर्यंत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक होता. पण आता भारत तंत्रज्ञान विकसित करीत आहे. याआधी 2जी, 3जी, 4जी या दूरसंचार सेवांसाठी भारत दुसऱ्या देशांवर अवलंबून होता. पण ‘5जी’ सेवा स्वत:च्या बळावर सुरू करून भारताने इतिहास घडविला आहे. त्यामुळे भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक बनून रहाणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या विकासात व अंमलबजावणीत सक्रिय भूमिका पार पडेल’’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर तंत्रज्ञानाचा विकासामुळे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

PM Modi at launch of 5G servicesपंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी देशातील ‘5जी’ दूरसंचार सेवेचा शुभारंभ झाला. ‘ही नव्या युगाची नांदी आहे. याने संधीची अफाट दारे खुली झाली आहेत. ‘5जी’च्या आगमनाबरोबर भारताने पहिल्यांदाच जागतिक मापदंडाशी बरोबरी साधली आहे’, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. ‘5जी’ सेवेचेे सर्वसामान्य जनतेला अनेकविध फायदे मिळतील. इंटरनेट सेवा यामुळे अतिशय जलद होणार आहे. विनाअडथळा नेटवर्क कव्हरेज, हाय डेटा रेट व उच्चदर्जाची दूरसंचार सेवा उपलब्ध होईल. टेलिसर्जरी, चालकरहित वाहनांच्या सेवांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरेल. नैसर्गिक आपत्तीवर रियल टाईम मॉनिटरिंग, कृषीकामात अचूकता आणि खाणकामासारख्या अतिधोकादायक कामांमध्ये मानवाचा प्रत्यक्ष वापर कमी करता येईल. 5जी तंत्रज्ञानात केवळ जलदगती इंटरनेट सुविधा उपलब्धतेपर्यंत मर्यादित नाही, तर यात लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

‘डिजिटल इंडियाची मोहीम 5जीमुळे अधिक वेगवान होईल. डिजिटल भारत हे केवळ शीर्षक नाही, तर तो विकासाचा दृष्टीकोन आहे. डिजिटल इंडियाने छोटे व्यापारी, छोटे स्वयंउद्योजक, स्थानिक कलाकार आणि कारागिरांना एक सशक्त व्यासपीठ दिले’, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानामुळे आपली कार्यक्षमता वाढते. त्यामुळे सर्वसामान्यांना जोडणारे, त्यांना उपयोगी पडणारे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा सरकारचा उद्देश आहे. सर्वांसाठी इंटरनेटची संकल्पना हा त्याचाच भाग ठरतो’, असे पंतप्रधानांंनी अधोरेखित केले.

घरोघरी वीज पुरवठ्यासाठी सरकारने योजना हाती घेतली. तसेच प्र्रत्येकाला शुद्ध पाणी पुरविण्यासाठी हर घर जल हे अभियान हाती घेतले. उज्वला योजनेद्वारे प्रत्येक गरिबाला इंधनगॅस उपलब्ध करून देण्यात आला. या योजनांप्रमाणेच सर्वांसाठी इंटरनेट हे ध्येय समोर ठेवून सरकार काम करीत आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

आज भारतीयांना जगात सर्वात कमी दरात डेटा मिळतो. हा दर प्रतिजीबी 300 रुपयांवरून प्रतिजीबी दहा रुपयांपर्यंत खाली आला, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 2014 सालापर्यंत भारतातून एकही मोबाईन फोन निर्यात होत नव्हता. मात्र आज हजारो कोटी रुपयांचे फोन भारतातून इतर देशांमध्ये निर्यात होतात. भारत हा मोबाईलचे उत्पादन घेणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. भारतात सध्या मोबाईलची निर्मिती करणारे 200 कारखाने आहेत, ही बाबही पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली.

भारताला पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला नसेल. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पुरेपूर लाभ भारताला मिळेल आणि प्रत्यक्षात भारत या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल असा मला विश्वास वाटतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सहा महिन्यात 200 शहरात ‘5जी’ सेवा सुरु होणार देशात 13 शहरांमध्ये 5जी सेवा प्राथमिक टप्प्यात सुरू होत आहे. यामध्ये प्रमुख महानगरांचा समावेश आहे. बीएसएनल या सरकारी कंपनीसह रिलायन्स, एअरटेल, वोडाफोन यासारख्या खाजगी कंपन्या लवकरच ही सेवा सुरू करीत आहेत. 200 शहरात पुढील सहा महिन्यात ही सेवा उपलब्ध होईल, असे दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तसेच पुढील दोन वर्षात देशाच्या 90 टक्के भागात 5जी सेवा उपलब्ध झालेली असेल आणि पुढील वर्षांपर्यंत ही सेवा अधिकच स्वस्त होईल, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली.

leave a reply