नवे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारला

नवी दिल्ली – जनरल बिपीन रावत यांच्यानंतर, देशाचे दुसरे संरक्षणदलप्रमुख म्हणून जनरल अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारला आहे. तिन्ही संरक्षणदलांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व आव्हानांवर एकजुटीने मात करण्यासाठी आपण झटणार असल्याची ग्वाही यावेळी जनरल चौहान यांनी यावेळी दिली. पाकिस्तान व चीनलगतच्या सीमेवरील तैनातीचा अनुभव असलेले कुशल सेनानी अशी जनरल अनिल चौहान यांची ओळख आहे. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलसाठी लष्करी सल्लागार म्हणूनही काम पाहिलेले आहे. यामुळे भारतीय संरक्षणदलांच्या ‘युनिफाईड थिएटर कमांड’च्या उभारणीसाठी जनरल चौहान यांच्या अनुभवाचा फार मोठा लाभ मिळेल, असे दावे सामरिक विश्लेषक करीत आहेत.

भारतीय संरक्षणदलांच्या थिएटर कमांडची उभारणी हे जनरल चौहान यांच्यावरील सर्वात मोठी जबाबदारी असेल, असे मानले जाते. जनरल रावत संरक्षणदलप्रमुख असताना युनिफाईड थिएटर कमांडची तयारी झाली होती. जनरल चौहान संरक्षणदलप्रमुख बनल्यानंतर ही प्रक्रिया अधिक गतीमान बनेल. जगभरात बदलत्या काळानुसार युद्धतंत्रात तसेच संरक्षणदलांच्या कार्यपद्धतीत खूप मोठे बदल झाले आहेत. त्यानुसार लष्कर, नौदल व वायुसेनेमधील समन्वय व सहकार्य वाढविण्याची फार मोठी आवश्यकता निर्माण झाली होती.

कारगिलच्या युद्धानंतरच तिन्ही संरक्षणदलांचा समावेश असलेल्या एकीकृत कमांड अर्थात युनिफाईड थिएटर कमांडची आवश्यकता निर्माण झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला होता. गेल्या काही वर्षात याबाबतच्या निर्णयावर एकवाक्यता झाली होती. यानुसार युनिफाईड थिएटर कमांड विकसित करण्यात येत असून यामुळे संरक्षणदलांचा एकाच गोष्टीवर होणारा अतिरिक्त खर्च खूपच कमी होईल. यामुळे साधनसंपत्ती व स्त्रोतांचा अधिक प्रभावीरित्या वापर करता येईल. मुख्य म्हणजे शत्रूच्या विरोधात हालचाली करताना तिन्ही संरक्षणदलांमध्ये समन्वय व संपर्क कायम राहिल. यामुळे संरक्षणदलांकडून शत्रूविरोधात जबरदस्त कारवाई करणे सोपे जाईल, असे दावे केले जातात. पुढच्या काळात याचे फार मोठे लाभ संरक्षणदलांना मिळतील. यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल, असा विश्वास सामरिक विश्लेषक व्यक्त करीत आहेत. म्हणूनच ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी जनरल अनिल चौहान यांची संरक्षणदलप्रमुखपदी निवड झाल्याचे दावे केले जातात.

गेल्या वर्षाच्या मे महिन्यात ईर्स्टन आर्मी कमांडर पदावरून अनिल चौहान निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे लष्करी सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. चीनविषयक तज्ज्ञ अशी जनरल अनिल चौहान यांची ओळख आहे. लडाखमधील गलवानच्या संघर्षानंतर भारतीय लष्कराच्या चीनविषयक धोरणात झालेल्या बदलांसाठी जनरल अनिल चौहान यांनी मोठे योगदान दिले होते.

leave a reply