अहमदाबाद – पुढच्या २५ वर्षात स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी वाढली, तर देशात बेरोजगारी शिल्लक राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यासाठी वोकल फॉर लोकल अर्थात स्थानिक पातळीवरील उत्पादनांचा पुरस्कार करण्याची आवश्यकता आहे. याने देश आत्मनिर्भर बनेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गुजरातच्या मोरबी येथे श्री हनुमंताच १०८ फुटांच्या मुर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी हनुमंत एक भारत श्रेष्ठ भारताचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र असल्याचे स्पष्ट केले. पारतंत्र्याच्या काळातून बाहेर येण्यासाठी भारताला अध्यात्मिक चेतनेमुळे फार मोठे बळ मिळाले होेते, याची आठवण यावेळी पंतप्रधानांनी करून दिली. हनुमंतांचे स्मरण करणे याचा अर्थ सेवाभाव-समर्पणाचा भाव याचे स्मरण करणे असा होतो, असे सांगून देशाच्या स्वतंत्र्यांची ७५ वर्षे पूर्ण होत असताना, सेवाभाव ज्या प्रमाणात प्रबळ होईल, त्याच प्रमाणात देश प्रगती करील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आत्ताच्या काळाचा दाखला देऊन पंतप्रधानांनी प्रगती केल्याखेरीज गत्यंतर नाही, हे आपण स्वीकारले पाहिजे, असा संदेश दिला. पुढच्या २५ वर्षांपर्यंत देशातच तयार झालेली, आपल्या कामगारांनी तयार केलेली उत्पादने खरेदी केली, तर देशातील बेरोजगारी संपुष्टात येईल, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. बाहेरून आलेल्या उत्पादनांच्या तुलनेत थोडाफार फरक असला तरी आपल्या देशात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवे. याने देशाची स्थितीगती बदलून जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी लाभली आहे. कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या सप्लाय चेन क्रायसिस अर्थात पुरवठा साखळीच्या संकटाने ग्रासलेले अनेक देश उत्पादनांच्या टंचाईचा सामना करीत आहेत. दुसर्या देशांमधून येणार्या उत्पादनांवर अवलंबून असलेल्या देशांची अवस्था यामुळे बिकट बनली आहे. यामुळे आपल्याच देशात उत्पादनाची प्रक्रिया गतीमान करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यापासून धडा घेऊन भारताने स्थानिक पातळीवरील उत्पादनांना चालना दिली असून संरक्षणाासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत आत्मनिर्भरतेला प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी जागतिक उद्योगक्षेत्राला भारताकडून ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ असा संदेश देत आहे. याला प्रतिसाद मिळू लागला असून चीनसारख्या देशातून बाहेर पडणार्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपल्या उत्पादनाचे केंद्र हलविण्याची तयारी करीत आहेत.
अशा परिस्थितीत, देशात तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी केल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे पंतप्रधान लक्षात आणून देत आहेत. यामुळे आपल्या ग्राहकशक्तीचा देशाच्या विकासासाठी अधिक प्रभावपणे होऊ शकतो, याची जाणीव पंतप्रधानांनी जनतेला करून दिलेली आहे.