नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नुकतीच सूत्रे हाती घेतलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात फोनवरून चर्चा पार पडली. भारत व ब्रिटनमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तसेच भारत व ब्रिटनमधील मुक्त व्यापारी करार लवकरच पूर्णत्त्वास नेण्याची तयारीही दोन्ही नेत्यांनी या चर्चेत दाखविली. तर ब्रिटनचे वाणिज्य मंत्री ग्रेग हॅन्डस् यांनी उभय देशांमधील व्यापारी करारावरील चर्चा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती देऊन लवकरच हा करार होईल, असा दावा केला आहे.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. पंतप्रधान मोदी व पंतप्रधान सुनक यांनी देखील सोशल मीडियावर या चर्चेची माहिती दिली आणि त्यावर समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान सुनक यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी पुढच्या काळात दोन महान लोकशाहीवादी देशांचे सहकार्य कुठल्या उंचीवर जाईल, हे पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले. तसेच भारत व ब्रिटनमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी पुढच्या काळात अधिकाधिक दृढ करण्यासाठी आपण पंतप्रधान सुनक यांच्यासमवेत काम करणार असल्याची ग्वाही देखील पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत दिली. तर भारत व ब्रिटनमधील मुक्त व्यापारी करारावरील चर्चेत आपण सहभागी झालो होतो, याची माहिती देऊन पंतप्रधान सुनक यांनी लवकरच हा करार मार्गी लागेल, असा दावा केला. दरम्यान, ब्रिटनच्या आधीच्या पंतप्रधान लिझ ट्रुस यांच्या कार्यकाळात उभय देशांमधील हा करार मागे पडला होता. त्यावेळच्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी भारत व भारतीयांबाबत केलेल्या विधानांमुळे या कराराची प्रक्रिया थांबली होती. पुढचत्या काळात ब्रेव्हरमन यांनी आपली विधाने मागे घेतली होती. तरीही भारताने त्यांच्या विरोधात स्वीकारलेली भूमिका बदलली नाही.
या पार्श्वभूमीवर, लिझ ट्रुस यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले. आधीच्या सरकारने काही चूका केल्या होत्या आणि त्या दुरूस्त करण्यासाठी मी पंतप्रधान बनलो आहे, असे सुनक यांनी म्हटले आहे. तसेच भारताबरोबरील आपल्या संबधांना विशेष प्राधान्य देणार असल्याचेही सुनक यांनी जाहीर केले आहे. पुढच्या काळात भारत व ब्रिटनचे सर्वच आघाड्यांवरील संबंध दृढ होतील, असा विश्वास सुनक यांच्या या विधानांच्या आधारे व्यक्त केला जातो. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापारी करारावरील चर्चा पूर्ण झाली असून लवकरच हा करार संपन्न होईल, असा दावा ब्रिटनचे नवे वाणिज्यमंत्री ग्रेग हॅन्डस् यांनी केला. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली गुरूवारी भारताच्या भेटीवर येणार आहेत. मुक्त व्यापारी करारासह इतर आघाड्यांवरील भारत व ब्रिटनचे संबंध व्यापक करण्यासाठी त्यांचा हा दौरा उपयुक्त ठरेल.