ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत

सिडनी/पोर्ट मोरेस्बी – पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी यासाठी भारत व ऑस्ट्रेलियाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी दोन्ही देश बांधिल आहेत. भारत व ऑस्ट्रेलियाची मैत्री व भागीदारी पूर्वी कधीही नव्हती इतकी दृढ झालेली आहे, असा दावा करून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. तर ऑस्ट्रेलियाबरोबरील भारताचे सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागतऑस्ट्रेलियामध्ये क्वाड देशांच्या वार्षिक शिखर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ही बैठक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याने जपानमध्येच पार पडली. त्यानंतर पापुआ न्यू गिनीचा दौरा करून सोमवारी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात दाखल झाले. इथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पंतप्रधान अल्बानीज यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या भारतभेटीतील स्वागताची आठवणही यांनी करून दिली. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान दोन्ही देशांमधील वार्षिक बैठकीसाठी भारतात आले होते. यावेळी झालेली द्विपक्षीय चर्चा पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणखी पुढे जाईल, असा विश्वास पंतप्रधान अल्बानीज यांनी व्यक्त केला. २४ मे रोजी पंतप्रधान मोदी व पंतप्रधान अल्बानीज यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही देशांमधील विविध पातळ्यांवर सहकार्य अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ॲग्र्रीमेंट’ झाले आहे. याअंतर्गत व्यापारी भागीदारी अधिक मजबूत करण्यावर यावेळी चर्चा होईल. तसेच ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यासाठीही व्यापक चर्चा होईल, असे ऑस्ट्रेलियन सरकारने माहिती दिली.

ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबरील व्यापारी व धोरणात्मक सहकार्य अधिकाधिक दृढ होत असताना, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील व्यापार घटत असल्याचे दिसते. राजकीय मतभेदांमुळे चीनने ऑस्ट्रेलिया धडा शिकविण्याची तयारी केली असून ऑस्ट्रेलियन उत्पादनांकडे चीनने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या भारताबरोबरील व्यापारी सहकार्याला धोरणात्मक महत्त्व आले आहे. भारत हा ऑस्ट्रेलियासाठी चीनचा अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याची चर्चा या देशात सुरू आहे.

ऑस्ट्रेलिया भेटीआधी पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदी यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा पार पडली. भारत-न्यूझीलंडमधील व्यापार, वित्तीय, शिक्षण, तंत्रज्ञान, क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करण्यावर या भेटीत एकमत झाले.

पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदी ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन-एफआयपीआयसी’ बैठकीत सहभागी झाले होते. पॅसिफिकमधील १४ बेट देशांबरोबर झालेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भारत तुमच्या विकासाचा भागीदार बनेल, अशी ग्वाही दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधला. ‘गरजेच्या वेळी कामी येतो तोच खरा मित्र’, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच काही वेळा आपण ज्याला विश्वासपात्र समजतो, तो गरजेच्यावेळी उभा राहत नाही, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. चीनचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान मोदी यांनी चीन विश्वसार्ह देश नाही, याची जाणीव करून दिली.

भारत पॅसिफिकमधील देशांच्या प्राथमिकतेचा आदर करतो आणि भारत तुमच्या आव्हानात्मक काळात तुमच्या बरोबर उभा असेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा जपान, पापुआ न्यु गिनी आणि ऑस्ट्रेलिया दौरा हा चीनविरोधात धोरणात्मक सहकार्याचा भाग असल्याचे मानले जात आहे. जी७ देशांनी जपानमधील बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिले होते. हा चीनविरोधातील आघाडी भक्कम करण्याचा एक भाग मानला जात आहे.

तसेच पॅसिफिक बेट देशांच्या नजीक सोलोमॉन आयलँडमध्ये चीन उभारत असलेला तळ हा ऑस्ट्रेलिया, जपानसह अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे येथील देशांबरोबर भारत वाढवित असलेले सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरते.

हिंदी

 

leave a reply