पंतप्रधानांची अमेरिकन सिनेटच्या सदस्यांशी चर्चा

नवी दिल्ली – अमेरिकन सिनेटच्या नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. अमेरिकेच्या सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाने भारताबरोबरील सहकार्याबाबत स्वीकारलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेचे यावेळी पंतप्रधानांनी स्वागत केले. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबरील अमेरिकन सिनेटच्या शिष्टमंडळाची इंडो-पॅसिफिक, भारताच्या शेजारी देशांमधील परिस्थिती, अफगाणिस्तानची स्थिती व युक्रेनमधील युद्धावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

US Senateअमेरिकन सिनेटचे मेजॉरिटी लिडर असलेल्या चार्ल्स शुमर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतात आलेल्या या शिष्टमंडळामध्ये रॉन वायडन, जॅक रिड, मारिया कँटवेल, एमी क्लोबुचर, मार्क वॉनर, गॅरी पीटर्स, कॅथरिन कोर्टेझ्‌‍ मॅस्टो आणि पीटर वेल्श या सिनेटर्सचा समावेश आहे. अमेरिकेच्या सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्याही सदस्यांचा सहभाग असलेल्या या शिष्टमंडळाबरोबरील चर्चेत पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी नुकतीच फोनवरून झालेल्या संवादाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व अमेरिकेची ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’ आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचा निर्धार या चर्चेत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

दोन्ही देशांमधील समान लोकशाहीवादी मुल्य, द्विपक्षीय सहकार्य, उभय देशांच्या जनतेमधील संवाद, या साऱ्यांवर पंतप्रधान मोदी व अमेरिकन सिनेटर्सच्या चर्चेत भर देण्यात आला. तसेच अमेरिकेतील भारतीय समुदायानेे उभय देशांमधील सहकार्य व्यापक करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल देखील या चर्चेत विशेषत्त्वाने घेण्यात आली. अमेरिकेतील भारतीय म्हणजे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकच दृढ करणारे स्तंभ म्हणून काम करीत असल्याचे या चर्चेत पंतप्रधान मोदी व अमेरिकन सिनेटर्सनी देखील मान्य केले.

याबरोबरच भारत व अमेरिकेमधील अतिप्रगत तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, संयुक्त संशोधन व उत्पादन तसेच विश्वासार्ह आणि सशक्त पुरवठा साखळी, यांच्याबाबतच्या सहकार्यावरही यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. अमेरिकन सिनेटर्सनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. भारतातील ऊर्जा, उत्साह आणि परिवर्तन घडवून आणत असलेले बदल पाहून अमेरिकन सिनेटर्स प्रभावित झाले, असा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर केला.

leave a reply