उत्तर कोरियाने आण्विक क्षमता असणारी दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

- नव्या वर्षातील तिसरी चाचणी

प्योनग्यँग/टोकिओ/सेऊल – शनिवारी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेणाऱ्या उत्तर कोरियाने अवघ्या ४८ तासांमध्ये दोन नवी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सोमवारी सकाळी डागलेली ही क्षेपणास्त्रे पॅसिफिक महासागरातील जपानच्या ‘एक्सक्ल्यूझिव्ह इकॉनॉमिक झोन’च्या(ईईझेड) बाहेरील भागात पडल्याची माहिती जपानी सूत्रांनी दिली. ही क्षेपणास्त्रे डागतानाच किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग यांनी संपूर्ण पॅसिफिक क्षेत्र उत्तर कोरियासाठी ‘फायरिंग रेंज’ असल्याचा इशारा दिला आहे. सोमवारी डागलेली क्षेपणास्त्रे ही नव्या वर्षात उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची तिसरी घटना ठरते.

सोमवारी सकाळी उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरील तळावरून एकापाठोपाठ एक अशी दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दोन्ही क्षेपणास्त्रांचा पल्ला ३३५ ते ४०० किलोमीटर्सच्या दरम्यान होता व लाँचर्सच्या सहाय्याने क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केल्याचे उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही क्षेपणास्त्रे ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन’चा भाग असल्याचा दावाही कोरियाच्या माध्यमांनी केला. जपानच्या संरक्षण विभागाने दोन्ही क्षेपणास्त्रांनी ५० ते १०० किलोमीटर्सची उंची गाठल्याची माहिती दिली.

उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्रांवर जपानने तीव्र प्रतिक्रिया नोंदवित सुरक्षा परिषदेच्या बैठकीची मागणी केली आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने क्षेपणास्त्र डागण्याची घटना म्हणजे गंभीर चिथावणी असल्याचे बजावले. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर कोरियातील पाच कंपन्या व चार अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याचीही घोषणा केली.

तीन दिवसात दोनदा क्षेपणास्त्रे डागणाऱ्या उत्तर कोरियाने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग यांनी थेट अमेरिकेला इशारा दिला. ‘अमेरिका व दक्षिण कोरियाने केलेल्या सरावाचा आमच्या देशाच्या सुरक्षेवर काय परिणाम होतो, याबद्दल अभ्यास सुरू आहे. अमेरिकेची संरक्षणदले पुढील काळात काय कारवाया करतात यावर पॅसिफिक क्षेत्राचा फायरिंग रेंज म्हणून कसा वापर करायचा हे उत्तर कोरिया ठरविल’, असे किम यो-जाँग यांनी बजावले. यापूर्वी शुक्रवारीही उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावले होते.

सोमवारी डागलेली क्षेपणास्त्रे ही उत्तर कोरियाने नव्या वर्षात क्षेपणास्त्र डागण्याची तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी १ जानेवारीला उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यानंतर शनिवारी १८ फेब्रुवारीला ‘ह्वासाँग-१५’ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. जवळपास १३ हजार किलोमीटर्सचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची ‘न्यूक्लिअर डिटरंट’ क्षमता चाचपण्यासाठी चाचणी घेतल्याचे सांगण्यात आले. सोमवारी डागलेली क्षेपणास्त्रेही ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ असल्याचा दावा कोरियन माध्यमांनी केला आहे.

गुरुवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचा शत्रूदेश व सर्वात मोठा धोका असा उल्लेख करणारा ‘डिफेन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध केला होता. त्यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. तर गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन याने आपल्या लष्कराला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर किम जाँगने दिलेल्या या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाल्याचे दक्षिण कोरियन माध्यमांनी म्हटले होते.

leave a reply