उडत्या तबकड्यांमागे परग्रहवासिय असण्याची शक्यता नाकारता येणार नाही

- ‘पेंटॅगॉन’च्या अहवालातील दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत 2004 सालापासून आढळलेल्या उडत्या तबकड्यांच्या घटनांमागे परग्रहवासिय असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही, असा दावा ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकी संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या ‘अनक्लासिफाईड रिपोर्ट’मधून ही बाब समोर आली. आतापर्यंत अमेरिकी संरक्षणदल अथवा प्रशासनाने देशाच्या संसदेसमोर उडत्या तबकड्यांच्या घटनांबाबत उघड कबुली दिली नव्हती. त्यामुळे हा अहवाल अमेरिकी प्रशासनाच्या धोरणातील एक निर्णायक वळण म्हणून ओळखण्यात येत आहे.

कॅनडाच्या लष्कराकडे ‘युएफओ’ पाहिल्याच्या नोंदी - अमेरिकन माध्यम कंपनीचा दावाअमेरिकेच्या संरक्षण विभागाने गेल्या वर्षी उडत्या तबकड्यांच्या घटनांचा छडा लावण्यासाठी ‘अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेनॉ टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. या टास्क फोर्सने दिलेल्या माहितीच्या आधारावर ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ या गुप्तचर यंत्रणेने अंतरिम अहवाल तयार केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर रुबिओ यांनी सिनेटच्या इंटेलिजन्स कमिटीच्या मार्फत या अहवालाची मागणी केली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला मान्यता देणार्‍या विधेयकावर स्वाक्षरी केली होती.

‘प्रिलिमिनरी अ‍ॅसेसमेंट: अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेनॉ’ असे संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालाचे नाव आहे. यात 2004 सालापासून ते 2021 पर्यंतच्या 144 घटनांची नोंद आहे. त्यातील फक्त एक घटना ‘डिफ्लेटेड बलून’ची होती, असा ठाम निष्कर्ष आहे. बाकी 143 घटनांबद्दल कोणतेही ठाम स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे अहवालात सांगण्यात आले. त्याचवेळी या उडत्या तबकड्यांच्या घटनांमागे परग्रहवासिय असण्याची शक्यताही पेंटॅगॉनच्या टास्क फोर्सने नाकारलेली नाही.

या उडत्या तबकड्या हवाई उड्डाणांसाठी धोका असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याचा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेतील काही अधिकारी तसेच संसद सदस्य सातत्याने परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. संसदेत सादर झालेल्या अहवालामुळे आता हा मुद्दा अधिक खुलेपणाने व आक्रमकरित्या मांडला जाईल, असा दावा अभ्यासक व विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये प्रदर्शित झालेल्या मुलाखती त्याला दुजोरा देणार्‍या ठरतात. यात, माजी राष्ट्राध्यक्ष, संसद सदस्य, अमेरिकी संरक्षणदलात काम करणारे माजी वैमानिक तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश होता.

2017 साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांबाबत संशोधन सुरू असल्याची अधिकृत कबुली दिली होती. 2007 ते 2012 या कालावधीत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यासंदर्भात एक विशेष गट स्थापन करून माहिती गोळा केली होती. त्यानंतर 2017 व 2018 साली अमेरिकी प्रसारमाध्यमे तसेच काही गटांकडून उडत्या तबकड्यांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले होते. सप्टेंबर 2019मध्ये अमेरिकी नौदलाने हे व्हिडिओ खरे असल्याचीही कबुली दिली होती.

leave a reply