सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

- नीति आयोगाचा इशारा

नवी दिल्ली – नीती आयोगाने केंद्र सरकारला कोरोनाच्या तिसऱ्याला लाटेबाबत अहवाल सादर केला असून यामध्ये सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख नवे कोरोना रुग्ण आढळू शकतात, असा नीति आयोगाचा अंदाज आहे. यासाठी तयार रहा, आयसीयूचे दोन लाख बेड सज्ज ठेवा अशी सूचना नीति आयोगाने केली आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता - नीति आयोगाचा इशाराकोरोनाच्या दुसऱ्याला लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. केरळ वगळता इतर राज्यात रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. दररोज तीस ते चाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण गेल्या महिनाभरापासून स्थिर आहे. यातीलही 70 टक्के रुग्ण हे केरळ व महाराष्ट्रात आढळत आहेत. मात्र एप्रिल ते जून दरम्यानच्या कोरोना लाटेचा पॅटर्न पाहता तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता भासू शकते. यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, असे नीति आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सारे जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या सामना करीत आहे. अमेरिका, ब्रिटन, रशियासह कित्येक देशात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविणाऱ्या नीति आयोगाच्या अहवालाचे काही तपशील माध्यमांसमोर आले आहेत. यानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षाही भयावह असू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत चार ते पाच लाख नवे कोरोना रुग्ण दरदिवशी आढळतील, अशी शक्यता आहे. तसेच 100 रुग्णांपैकी 23 जणांना रुग्णालयात भरती करावे लागू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेडची आवश्‍यकता भासेल. त्यामुळे यासाठी सज्ज राहण्याची आवश्‍यकता असल्याचे नीति आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
नीति आयोगाने केलेल्या शिफारसीमध्ये दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवण्यास सांगितले आहे. यामध्ये 1.2 लाख आयसीयू बेड व्हेंटिलेटर्सच्या सुविधेने युक्त असावेत. याशिवाय सात लाख सामान्य बेडची आवश्‍यकता भासेल. यातील पाच लाख बेड्सना ऑक्सिजन सुविधा असावी, तसेच याव्यतिरिक्त 10 लाख कोविड केअर बेड तयार ठेवा, अशा सूचना नीति आयोगाने केल्या आहेत.

नुकतेच देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागल्याचे जिनोम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यातून स्पष्ट झाले होते. डेल्टा प्लसच्या संबंधीत 11 उपप्रकार आढळले असल्याची बातमीही आली होती. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंट भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर नीति आयोगाच्या अहवालाचे तपशील समोर आले आहेत. हा अहवाल गेल्याच महिन्यात सादर करण्यात आला होता.

सध्या केरळ वगळता सर्वच राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम मोठ्या प्रमाणात शिथील केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली असून कित्येक नागरिकांकडून मास्क, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. कोरोना अद्याप गेला नसल्याचा इशारा यामुळे वारंवार दिला जात आहे.

leave a reply