कोरोनानंतरचे जागतिकीकरण प्रामाणिक व समानतेवर आधारीत असावे

- भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्था विस्कळीत झाली असून सध्याचा कल पाहता, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सुधारणा घडविणे आवश्यक बनले आहे. कोरोनानंतरचे जागतिकीकरण प्रामाणिक, समानता आणि मानवतेवर आधारीत असावे, अशी भारताची अपेक्षा असल्याची भूमिका परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी मांडली. त्याचबरोबर, येत्या काळात जागतिक पुरवठा साखळीचे मुख्य केंद्र म्हणून स्वत:ला विकसित करणे याला भारताची प्राथमिकता असेल, असेही श्रींगला म्हणाले.

कोरोनानंतरचे जागतिकीकरण प्रामाणिक व समानतेवर आधारीत असावे - भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगलासेंट स्टिफन्स कॉलेजच्या ‘इंडिया अ‍ॅण्ड रिशेपिंग ऑफ द वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावरील उद्घाटन सत्रात बोलताना परराष्ट्र सचिव श्रींगला यांनी कोरोनाव्हायरसने जागतिक व्यवस्थेवर केलेला परिणाम, चीनची विस्तारवादी भूमिका आणि भारताची तयारी यावर आपली मते मांडली. “भारत हा सार्वभौमत्वाच्या संकल्पनेवर आधारीत देश आहे. त्याचबरोबर विवादांचे शांततेने निराकरण केले पाहिजे आणि इतर देशांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये, या सामान्य तत्वांचे पालन करणारा देश आहे,” असे सांगून श्रींगला यांनी शेजारी देशांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला.

तर “जागतिकीकरणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे, असा भारताचा विश्वास आहे. यासाठी सध्याची मानसिकता व वास्तविकता लक्षात घेऊन जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सुधारणा घडविणे आवश्यक आहे”, असे परराष्ट्र सचिव म्हणाले. आतापर्यंत जागतिकीकरणाकडे केवळ आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले जात होते. पण भारताच्या पंतप्रधानांनी मांडलेली मानवकेंद्री जागतिकीकरणाची संकल्पना याहून अधिक व्यापक आहे, असे श्रींगला यावेळी म्हणाले. तर भारताला जागतिक पुरवठा साखळीतील पर्यायी उत्पादन केंद्र बनविण्याचे कार्य सुरू झाल्याचा दावा श्रींगला यांनी केला.

या संकटाच्या काळातही ‘शेजारी देशांना प्राधान्य’ भारताचे धोरण राहिले असून ‘बिमस्टेक’ देशांबरोबरच ‘असियान’ आणि ‘थिंक वेस्ट’ अंतर्गत आखाती आणि पश्चिम आशियाई देशांबरोबरचे संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा आधार असल्याचे श्रींगला यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र मुक्त आणि खुले असावे व या क्षेत्रातील देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जावा तसेच आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत इथले वाद सोडविण्यात यावे, अशी भारताची ठाम भूमिका असल्याचे परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे. तर ‘वसुधैव कुटूंबकम’ आणि ‘निष्काम कर्म’ या तत्वांवर दृढ विश्वास असणार्‍या भारताने या कोरोनाव्हायरसच्या काळात १५० हून अधिक देशांना वैद्यकीय सहाय्य पुरविल्याची माहिती श्रींगला यांनी दिली आहे.

leave a reply