राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची ‘गन कंट्रोल’ विधेयकावर स्वाक्षरी

- 28 वर्षानंतर प्रथमच नवा कायदा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील वाढत्या ‘मास शूटिंग’ घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बंदुकींच्या वापरावर नियंत्रण आणणाऱ्या नव्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. ‘बायपार्टिझन सेफर कम्युनिटीज्‌‍ ॲक्ट’ असे या विधेयकाचे नाव आहे. बंदूक घेणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची कठोर तपासणी, ‘मेंटल हेल्थ सर्व्हिसेस प्रोग्राम’, कठोर कायद्यांसाठी विविध राज्यांना निधी यासारख्या तरतुदींचा यात समावेश आहे. अमेरिकेत 1994 साली मंजूर झालेल्या ‘फेडरल ॲसॉल्ट वेपन्स बॅन’नंतरचा हा पहिलाच मोठा कायदा ठरला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यूयॉर्कमधील ‘गन कंट्रोल’संदर्भातील कायदा रद्दबातल ठरविला होता. या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाचा नवा कायदा महत्त्वाचा ठरतो.

‘कोलंबाईनपासून उवाल्डेपर्यंत अमेरिकेत अनेक बेछूट गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. दरदिवशी अमेरिकेतील रस्त्यांवर होणाऱ्या गोळीबारांच्या घटनांमध्ये किती बळी जातात याची आपल्याला धड कल्पनाही नाही. पण ते सगळे काहीतरी करा म्हणून आपल्याला विनवणी करीत आहेत. आज आपण काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कायद्यामुळे अनेकांचे जीव वाचतील’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘बायपार्टिझन सेफर कम्युनिटीज्‌‍ ॲक्ट’वर स्वाक्षऱ्या केल्या.

या वर्षाच्या जानेवारी ते जून या साडेपाच महिन्यांच्या काळात 250हून अधिक ‘मास शूटिंग’च्या घटना घडल्या असून त्यात सुमारे 400 जणांचा बळी गेला आहे. त्यात मे महिन्यात घडलेल्या दोन ‘मास शूटिंग’च्या घटना खळबळ उडविणाऱ्या ठरल्या. टेक्सासमधील ‘रॉब एलिमेंटरी स्कूल’मध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा बळी गेला होता. तर न्यूयॉर्कच्या बफेलोमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा बळी गेला. या दुर्घटनांमुळे अमेरिकेत ‘गन कंट्रोल’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.

‘रॉब एलिमेंटरी स्कूल’च्या घटनेनंतर अमेरिकेच्या संसदेतील दोन्ही पक्षांचे काही सिनेटर एकत्र आले व त्यांनी नव्या विधेयकाची मागणी केली. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात विधेयकाचा मसुदा तयार करून ते सिनेटमध्ये मांडण्यात आले. सिनेटमध्ये विधेयक 65 विरुद्ध 33 मतांनी मंजूर करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसातच अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातही विधेयकाला मान्यता देण्यात आली. ‘गन कंट्रोल’च्या मुद्यावर इतक्या कमी काळात संसदेत विधेयक मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

अमेरिकेच्या संसदेत ‘गन कंट्रोल’संदर्भातील विधेयक मंजूर होण्याची गेल्या 28 वर्षातील ही पहिलीच घटना ठरते. 1994 साली अमेरिकेच्या संसदेने ‘फेडरल ॲसॉल्ट वेपन्स बॅन’ या कायद्याला मान्यता दिली होती. त्यानंतर अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या अनेक घटना घडल्या असल्या तरी रिपब्लिकन पार्टीच्या कडव्या विरोधामुळे ‘गन कंट्रोल’ विधेयके मंजूर होऊ शकली नव्हती. नव्या ‘बायपार्टिझन सेफर कम्युनिटीज्‌‍ ॲक्ट’मधील 21 वर्षांखालील व्यक्तींच्या पार्श्वभूमीची कठोर तपासणी ही तरतूद लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

leave a reply