भारताने केलेल्या सहाय्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मानले आभार

नवी दिल्ली, दी ३० ( वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना भारताने केलेल्या सहाय्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या फोनवरील चर्चेत पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताने केलेल्या सहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बांगलादेश सारख्या इतर सार्क सदस्य देशांना कोरोनाव्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी भारताने १५ लाख डॉलर्सचे सहाय्य घोषित केले आहे. तसेच सार्क देशांना औषधे मोबाईल वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करून भारताने बांगलादेशला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या सुमारे २० लाख टॅबलेट पुरविल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेले आभार दोन्ही देशांचे संबंध अधिकच मजबूत करणारे ठरतात.

कोरोनाव्हायरसच्यासाथीमुळे जगभरातील आर्थिक व्यवहार व मालवाहतूक ठप्प झालेली असली तरी रस्ते जलमार्ग रेल्वे तसेच हवाई मार्गाने भारत-बांगलादेश एकमेकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. यावर पंतप्रधान मोदी व बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशात ही साथ रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. भारताने बांगलादेशला कोरोनाव्हायरस रुग्णांवरील उपचाराकरिता आत्तापर्यंत सर्वात प्रभावी ठरलेल्या औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या सुमारे वीस लाख गोळ्या पुरविल्या आहेत तसेच सार्क देशांना भारताने पंधरा लाख डॉलर्सचे सहाय्य केले असून यातील काही हिस्सा बांगलादेशला देखील मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी आभार व्यक्त करून भारताला धन्यवाद दिले आहेत.

पाकिस्तानचा अपवाद वगळता सार्क सदस्य असलेल्या सर्वच देशांनी भारताने कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना केलेल्या सहायाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामुळे काश्मीर प्रश्न उपस्थित करून भारताची कायम कोंडी करू पाहणाऱ्या पाकिस्तानची यावेळी कोंडी झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच नाहीतर आपल्या आर्थिक सामर्थ्याचा वापर करून सार्क सदस्य देशांवर आपला प्रभाव वाढविण्यासाठी आसुसलेल्या चीनलाही यामुळे फार मोठा धक्का बसला आहे. या साथीची माहिती बराच काळ जगापासून दडवून ठेवणार्‍या चीनवर जगभरातून अविश्वासाचे आरोप होत असून विश्वासघातकी देश अशी चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बनली आहे. तर जगभरातील देशांना औषधे व इतर वैद्यकीय साहित्य व मदत पुरविणाऱ्या भारताची प्रतिमा उजळून निघाली आहे.

leave a reply