लंडन – चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून अत्यंत क्रूरपणे मानवाधिकारांची गळचेपी होत असून, पुढील काळात चीनबरोबर संबंध ठेवताना ब्रिटनने आपले डोळे नीट उघडे ठेवण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाने केले. ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या ‘ह्युमन राईट्स कमिशन’ने चीनवर टीकेची झोड उठविणारा आक्रमक अहवाल सादर केला आहे. त्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चीनबरोबरील संबंधांबाबत फेरविचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावर ब्रिटनने घेतलेल्या भूमिकेवरून चीनने धमकावल्याचे समोर आले होते.
२०१० सालानंतर ब्रिटनने चीनबरोबर संबंध अधिक मजबूत व व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या होत्या. ब्रिटन व चीनमध्ये झालेल्या मोठ्या व्यापारी तसेच गुंतवणुकविषयक करारानंतर दोन देशांमध्ये ‘सुवर्णयुग’ सुरू झाल्याचे दावेही राजकीय नेते तसेच विश्लेषकांकडून करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात दोन देशांमधील संबंध बदलण्यास सुरुवात झाली असून ब्रिटनने चीनबाबत अधिक आक्रमक धोरण स्वीकारले आहे. कोरोनाची साथ, साऊथ चायना सीमधील कारवाया, हाँगकाँगमधील कायदा, उघुरवंशिय, ५जी तंत्रज्ञान या मुद्यांवरून ब्रिटनने चीनच्या विरोधात उघड भूमिका घेत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ब्रिटनच्या सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षाच्या समितीने तयार केलेला अहवालही त्याचाच भाग ठरतो. या अहवालात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून चीनमध्ये सुरू असलेल्या क्रूर व अमानुष कारवायांचा वेध घेण्यात आला आहे. कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असलेला जनतेचा छळ, कामगारांचा गुलामांसारखा होणारा वापर, उघुरवंशियांसारख्या अल्पसंख्य गटावर होणारी दडपशाही, अपहरणाच्या घटना व आपल्याच नागरिकांची होणारी टेहळणी यासारख्या मुद्यांवर अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
‘जगभरातील विविध देशांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत व ब्रिटनने त्याविरोधात आवाज उठवायला हवा. यात चीन अपवाद असू शकत नाही. मात्र केवळ आवाज उठवून थांबता येणार नाही, तर भविष्यात चीनबरोबर संबंध ठेवताना ब्रिटनने आपले डोळे पूर्णपणे उघडे ठेवायला हवेत’, असे ब्रिटनचे माजी परराष्ट्रमंत्री विल्यम हेग यांनी अहवालाचा हवाला देत बजावले. ब्रिटनच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख टॉम ट्युगेन्डहॅट यांनी, कम्युनिस्ट राजवटीकडून होणारे गुन्हे सोव्हिएत रशियातील हुकुमशहा स्टॅलिनपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप केला. त्याचवेळी ब्रिटनने गेल्या दशकात जवळीक साधलेली चिनी राजवट व आताचे राज्यकर्ते यांच्यात फरक असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे यापुढील काळात ब्रिटनला चीनबरोबरील संबंधांचा फेरविचार करणे भाग पडेल, असेही ट्युगेन्डहॅट यांनी म्हटले आहे.