पंतप्रधान लवकरच नॅटग्रिडची घोषणा करतील

-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – घातपात घडविण्याच्या आधीच दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकणार्‍या ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड-नॅटग्रिड’चा लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची माहिती दिली. नॅटग्रिडमुळे सुरक्षा यंत्रणा तसेच सेवा पुरविणार्‍या संस्थांचे नेटवर्क यामुळे कार्यान्वित होईल. याने दहशतवादी तसेच संशयितांच्या हालचाली टिपणे अत्यंत सोपे बनेल व घातपात घडविण्याच्या आधीच त्यांच्या मुसक्या आवळणे शक्य होणार आहे.

२००८ साली झालेल्या २६/११ च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर अशा स्वरुपाच्या यंत्रणेची आवश्यकता समोर आली होती. हा भ्याड हल्ला घडविणार्‍या दहशतवाद्यांनी फार आधी याची पूर्वतयारी केली होती. त्यांच्या संशयास्पद हालचाली टिपण्यात आलेल्या अपयशाची गंभीर दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. त्यानंतर ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड-नॅटग्रिड’सारख्या प्रभावी यंत्रणेची आवश्यकता स्पष्ट झाल्यानंतर या दिशेने काम सुरू झाले होते. तब्बल १२ वर्षानंतर ही नॅटग्रिड सज्ज असल्याचे समोर येत आहे.

‘ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट-बीपीआरडी’च्या ५१व्या स्थापनादिनी झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची माहिती दिली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी याची घोषणा करणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले. कोरोनाचे संकट आले नसते, तर याआधीच ही यंत्रणा कार्यान्वित झाली असती, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, संशयास्पद हालचालींची माहिती वेळीच मिळवून त्याचे जलदगतीने विश्‍लेषण करून तातडीने त्यावर कारवाई करण्याची योजना ‘नॅटग्रिड’मुळे प्रत्यक्षात उतरेल.

याच्या पहिल्या टप्प्यात देशाच्या दहा सुरक्षा यंत्रणा व २१ सर्व्हिस प्रोव्हायडर्स अर्थात विविध सेवा पुरविणार्‍या यंत्रणा एकत्रितपणे काम करतील. पुढच्या काळात देशातील ९५० सर्व्हिस प्रोव्हायडर्स या योजनेशी जोडले जातील. यामुळे देशात येणार्‍या व देशाबाहेर जाणार्‍या प्रत्येक संशयिताची तपशीलवार माहिती मिळविणे, त्याचा अभ्यास करून वेळीच कारवाई करता येऊ शकते. यासाठी सुरक्षा यंत्रणांमध्ये आवश्यक असलेला समन्वय प्रस्थापित होईल व त्वरित कारवाईचा निर्णय देखील घेता येऊ शकतो.

केंद्रीय यंत्रणांकडे असलेली अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील माहिती योग्य वेळेत सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागत नाही, ही दहशतवाद्यांविरोधातील लढाईतील प्रमुख समस्या असल्याचे मानले जात होते. पण नॅटग्रिडमुळे या समस्येचे निकारण होईल. ही बाब भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. अफगाणिस्तानसारखा देश तालिबानच्या ताब्यात गेलेला असताना, जगाला दहशतवाद्यांपासून असलेला धोका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जगभरातील प्रमुख देशांचे नेते व आजीमाजी अधिकारी दहशतवादी हल्ल्यांचे इशारे देत आहेत. पाकिस्तानसारखा दहशतवादाचा उघडपणे पुरस्कार करणार्‍या देशाचा शेजार लाभलेल्या भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हाने यामुळे अधिकच तीव्र बनली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, नॅटग्रिडसारख्या यंत्रणेमुळे दहशतवादी हल्ले व घातपातांचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊन यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply