नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात मध्यप्रदेशमध्ये दिवसाला १२ हजार ‘पर्सनल प्रोक्टेट एक्विपमेंट’ची (पीपीई) किट्सची निर्मिती केली जाते. आतापर्यंत या राज्यात जवळपास दीड लाख पीपीई किट्स तयार झाली आहेत. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पीपीई किट्सची भारतात मोठी कमतरता जाणवत होती. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्सच्या कमतरतेबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर, केंद्र सरकारने पीपीई किट्स आयात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता डीआरडीओनेच लाखो पीपीई किट्स विकसित करून कंपन्यांना याचे तंत्रज्ञान पुरविले आहे.
डीआरडीओने कोरोनाव्हायरसच्या युध्दपातळीवर व्हेटिंलेटर्स, पीपीई किट्स, मास्क, बायो सूट विकसित केले होते. आता त्यांनी देशातर्गंत कंपन्यांना याच्या निर्मितीची परवानगी दिली आहे. यानुसार मध्यप्रदेशमधल्या कंपन्या वेगाने पीपीई किट्स तयार करण्याच्या कामाला लागल्या आहेत.
मध्यप्रदेशमधल्या कंपन्यामध्ये दिवसाला १२ हजार पीपीई किट्स तयार केले जातात. मध्यप्रदेशमध्ये दिवसाला दहा हजार किट्सची मागणी आहे. तर शिल्लक राहिलेले किट्स आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन दिल्याचे मध्यप्रदेशच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले. आतापर्यंत त्यांनी दीड लाख पीपीई किट्सची निर्मिती केली आहे. यातील ७५ हजार किट्स इंदोर आणि भोपाळला देण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. तसेच मध्यप्रदेशमध्ये मास्क तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, भारतीय रेल्वे देखील मोठ्या प्रमाणावर पीपीई किट्सची निर्मिती करीत आहे.