‘साऊथ चायना सी’ मधील चीनच्या कारवायांवर अमेरिकेचा जोरदार आक्षेप

‘साऊथ चायना सी’ मधील चीनच्या कारवायांवर अमेरिकेचा जोरदार आक्षेप

वॉशिंग्टन – साऱ्या जगाचे लक्ष कोरोनाव्हायरस विरोधी कारवाईवर केंद्रीत झाल्याची संधी साधून चीनने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावर अधिकार गजविण्यास सुरुवात केली आहे. चीनने या क्षेत्रातील बेटांचा दोन जिल्ह्यांमध्ये समावेश करुन सदर बेटांवर प्रशासकीय अधिकारी नेमण्याची घोषणा केली. मात्र चीनची ही कारवाई व्हिएतनाम, फिलिपाईन्स या शेजारी देशांचे सार्वभौम अधिकार नाकारणारी असल्याचे सांगून अमेरिकेने त्यावर आक्षेप घेतला. दरम्यान, ‘साऊथ चायना सी’मध्ये लष्करी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनच्या सुरु असलेल्या हालचाली भारतासमोरही आव्हान उभे करणार असल्याचे विश्लेषकांनी बजावले आहे.

गेल्या आठवड्यात चीनच्या सरकारने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील सुमारे ८० भौगोलिक ठिकाणांना नावे देऊन सदर ठिकाणे चीनच्या मालकीचे असल्याचा आव आणला होता. यामध्ये छोट्यामोठ्या अशा २५ बेटांचा तसेच समूद्राखालील ५५ ठिकाणांचा समावेश होता. पॅरासेल आणि स्प्राटले बेट समुहाच्या क्षेत्रातील या ठिकाणांच्या देखरेखीसाठी प्रशासकिय अधिकारी नेमून चीनने सदर बेटांवर आपला संपूर्ण अधिकार प्रस्थापित करण्यासाठी हालचाली केल्याचे दिसत आहे.

चीनच्या या कारवाईवर व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या शेजारी देशांबरोबर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिएतनामच्या बेटांवर आणि सागरी क्षेत्रावर कब्जा करुन चीनने घेतलेला हा निर्णय आपल्या सर्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा म्हणूनच बेकायदेशीर असल्याचा आरोप व्हिएतनामने केला. तर फिलिपाईन्सने चीनच्या राजदूतांना याप्रकरणी समन्स बजावले आहेत. चीनच्या या हालचालींची गंभीर दखल घेऊन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर कोरडे ओढले आहेत.

‘सारे जग कोरोनाविरोधात लढत असल्याचा फायदा घेऊन चीनने ‘साऊथ चायना सी’वर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका व या क्षेत्रातील देशांच्या सागरी सुरक्षेला असलेला धोका कोरोनाव्हायरस संकटाच्या काळातही कमी झालेला नसून उलट त्यात वाढ झाली आहे, हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आखलेल्या कटकारस्थानावरून उघड होत आहे, अशी जळजळीत टीका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. ‘अमेरिका चीनच्या या एकतर्फी कारवाईचा निषेध करीत असून इतर देशांनीही चीनच्या विरोधात उभे रहावे’, असे आवाहन पॉम्पिओ यांनी केले.

दरम्यान, साऊथ चायना सी’मधील चीनच्या या आक्रमक हालचाली भारताच्या चिंता वाढविणाऱ्या ठरतील, असा इशारा ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’ या अभ्यासगटाचे विश्लेषक अभिजीत सिंग यांनी केला आहे. चीनच्या नौदलाच्या कारवाया साऊथ चायना सी क्षेत्रापर्यंत मर्यादित राहणार नाही. तर चीन हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत याचा विस्तार करील, याची जाणीव सिंग यांनी करुन दिली.

leave a reply