रेल्वे सुरक्षादलाकडून ई-तिकीट घोटाळा करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त

- १०० जणांना अटक

बंगळुरू – पाकिस्तानी सॉफ्टवेअरचा वापर करून ई-तिकीट घोटाळा करणारी आंतरराष्ट्रीय टोळी रेल्वे सुरक्षादलाने उद्ध्वस्त केली आहे. ही टोळी सुमारे २५ हजार हॅकर्स व दलालांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ब्लॅक मार्केट’चा भाग असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. ‘दक्षिण पश्चिम रेल्वे’कडून याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, सूत्रधारासह १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी तत्काळ तिकिट बुकिंगसाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता.

ई-तिकीट

तत्काळ तिकिट बुकिंगसाठी उपयोगात येणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ व बँकेच्या सुरक्षा यंत्रणांना बगल देणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तात्काळ बुकिंग करण्यात येत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिला होता. या सॉफ्टवेअरद्वारे तत्काळ तिकिटांचे बुकिंगसाठी आयआरसीटीसी तत्काळ सिस्टीम आणि बँकेच्या ओटीपीची आवश्यकता लागत नव्हती. सॉफ्टवेअरच्या मदतीने तिकीट थेट बुकिंग करण्यात येत असत. ही टोळी वापरत असलेले सॉफ्टवेअरमुळे तत्काळ तिकीट बुकिंगला सुरुवात झाल्यावर काही वेळातच तिकीते संपत होती. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळणे मुश्किल झाले होते. ही तिकिटे नेहमीच्या दरापेक्षा पाचपट अधिक किंमतीने काळ्या बाजारात विकली जात असत.

ई-तिकीट

गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर आरपीएफने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली. अखेर याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यास आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी यश आले. त्याच्या चौकशीत घोटाळ्याच्या सूत्रधाराबद्दल माहिती मिळाली. आरपीएफच्या पथकाने जानेवारी २०२० मध्ये ओडिशाच्या केंदरपारा येथे त्याला अटक केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी बंगळुरूला आणण्यात आले होते.
या चौकशीत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

ई-तिकीट

अटक केलेल्या व्यक्तीकडे इस्रो, रेल्वे आणि इतर सरकारी संस्थांची उपकरणे हॅक करण्यासाठी लिनक्सवर आधारित हाय-लेव्हल हॅकिंग सिस्टम असलेले पाकिस्तानी सॉफ्टवेअर होते. त्याव्यतिरिक्त सूत्रधाराकडे ३ हजार बँक खात्यांची तसेच बिटकॉइन्स व क्रिप्टोकरन्सी लिंक्सची माहितीही आढळल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले. भारतासह परदेशात सुमारे २५ हजार हॅकर्स व दलालांचा समावेश असणारे ‘ब्लॅक मार्केट’ सक्रिय असल्याचा दावाही सूत्रधाराकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यातून मिळणाऱ्या काळ्या पैशांचा वापर देशविरोधी आणि गुन्हेगारी कारवायांसाठी करण्यात येत होता, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

leave a reply