‘रॉ’चे प्रमुख नेपाळच्या भेटीवर

काठमांडू – पुढील महिन्यात भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी भारताची गुप्तचर संघटना ‘रिसर्च ॲण्ड ॲनॅलिसिस विंग’चे (रॉ) प्रमुख सामंत गोयल नेपाळ भेटीवर गेले आहेत. चीनने नेपाळची जमीन बाळकावल्याचे समोर आल्यावर नेपाळमधील चीनधार्जिणे के.पी. शर्मा ओली यांचे सरकार अडचणीत आले आहे. या सरकारला विरोधीपक्ष आणि जनतेच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. यानंतर के.पी. शर्मा ओली यांच्याकडून भारताशी जुळवून घेण्याचे संकेत देणारे काही निर्णय गेल्या काही दिवसात घेण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर ‘रॉ’ प्रमुखांचा हा नेपाळ दौरा महत्वाचा ठरतो.

'रॉ'चे प्रमुख नेपाळच्या भेटीवरनेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारताने आपल्या भूमीवर कब्जा केल्याचा आरोप लावून नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर भारत आणि नेपाळमधील संबंधात दुरावा निर्माण झाला होता. सीमावादावर चर्चा करण्यासाठी आता नेपाळानेच वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे, असे भारताने स्पष्ट केले होते. कारण भारताचा भूभाग आपल्या नकाशात समावेश करून नेपाळनेच दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन केले होते. दोन्ही देशांमधील सीमावाद चर्चेतून सोडवला जाऊ शकतो असे भारताचे म्हणणे होते.

हे बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी नेपाळच्या पंतप्रधानानी स्वतःहून प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देऊन द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याची विनंती केली होती. इतकेच नाही तर वादग्रस्त नकाशा असलेल्या पाठ्यपुस्तकावर बंदी घातली. भारतविरोधी अशी ओळख असलेल्या ईश्वर पोखरेल यांच्या संरक्षणमंत्री पदावरून हटविण्यात आले. तसेच भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नेपाळचे मानद जनरलपद देण्याचा निर्णयही ओली सरकारने घेतला आहे.

चीनला संदेश देण्यासाठी पंतप्रधान ओली ही भूमिका घेत असल्याचे सांगितले जात आहे. कारण चीनने नेपाळच्या हुमलामध्ये बळकावलेल्या जमिनीवर वेगाने बांधकामे सुरू केले आहे. ही बांधकामे बॉर्डर पिलर १२ च्या आत आहेत. इतकेच नाही लापचा जिल्ह्यातही नेपाळच्या मोठ्या भूभागावर चीनने अतिक्रमण केले आहे. चीनच्या या अतिक्रमणावरून नेपाळमधील विरोधी पक्ष ओली सरकारला धारेवर धरत आहेत. तसेच जनतेचा पाठिंबाही कमी झाला आहे.

या पार्श्वभूमीवर रॉ प्रमुख सामंत गोयल नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या भेटीत रॉ प्रमुख सामंत गोयल नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत.

leave a reply