मंदी व आर्थिक अस्थैर्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चार ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा

ukraine-IMF-Fundsवॉशिंग्टन – जागतिक अर्थव्यवस्थेच्या मूलभूत रचनेत बदल होत असून आर्थिक अस्थैर्य व मंदीचा धोका वाढला आहे. अस्थैर्य व मंदीमुळे पुढील चार वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल चार ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी दिला. तर वर्ल्ड बँकेने अर्थव्यवस्थेतील कर्जाच्या वाढत्या बोज्याकडे लक्ष वेधताना कर्जामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाची (डेब्‌‍ क्रायसिस)पाचवी लाट सुरू असल्याचे बजावले आहे. गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अहवालात, 2007 साली आलेल्या मंदीपेक्षा अधिक वाईट मंदीला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता.

global economyयेत्या आठवड्यात नाणेनिधीची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीविषयी आपली भूमिका मांडताना नाणेनिधीच्या प्रमुखांनी गंभीर इशारा दिला. ‘भूराजकीय स्तरावरील विभाजनामुळे कोरोनाची साथ, रशिया-युक्रेन युद्ध तसेच नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांना तोंड देणे अधिकच कठीण झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या मूलभूत रचनेत बदल होत आहेत. आर्थिक सहकार्यासाठी असणारी नियमांची चौकट व त्यामुळे असलेली निश्चितता, कमी व्याजदर व घटलेली महागाई यांची जागा आता नव्या पर्वातील वाढत्या आर्थिक कमकुवतपणाने घेतली आहे’, असे क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी बजावले.

Recession and economic instability‘नव्या पर्वात अनिश्चितता अधिकच वाढली आहे. आर्थिक पातळीवरील अस्थैर्य व भूराजकीय संघर्षही तीव्र झाले आहेत. भयावह नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण व व्याप्तीत भर पडली आहे. त्यामुळे एखाद्या देशातील स्थिती सातत्याने ढासळू शकते. कोरोना साथीनंतर वारंवार बसणाऱ्या धक्क्यांनी अर्थव्यवस्थेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे विकासावर परिणाम होत आहे. चीनचे कोरोनासंदर्भातील धोरणे, अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती व मध्यवर्ती बँकांकडून वाढणारे व्याजदर यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला असणारे धोके वाढत आहेत’, असा इशारा नाणेनिधीच्या प्रमुखांनी दिला. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत नाणेनिधीकडून जागतिक अर्थव्यवस्था मंदीत असल्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले जाईल, असे संकेतही जॉर्जिवा यांनी दिले.

मंदी व इतर धोक्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला पुढील काही वर्षांमध्ये तब्बल चार ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होईल, याकडे नाणेनिधीच्या प्रमुखांनी लक्ष वेधले. हे नुकसान जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराइतके असून जगासाठी हा मोठा धक्का ठरतो, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाणेनिधीच्या प्रमुख मंदी व आर्थिक नुकसानीकडे लक्ष वेधत असतानाच वर्ल्ड बँकेच्या प्रमुखांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील कर्जाच्या बोज्यामुळे निर्माण होणाऱ्या संकटाची जाणीव करून दिली.

जगातील अविकसित देशांना कर्जाच्या परतफेडीसाठी 44 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम मोजावी लागणार असून, ही बाब जागतिक अर्थव्यवस्थेवरील कर्जाच्या नव्या संकटाकडे निर्देश करणारी ठरते, असे वर्ल्ड बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी बजावले. मालपास यांनी याचा उल्लेख कर्जाच्या संकटाची पाचवी लाट असा केला आहे.

leave a reply