रशिया आणि अमेरिकेतील संबंध वैरापासून संघर्षापर्यंत येऊन ठेपले

- रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह

मॉस्को – ‘गेल्या काही वर्षांमध्ये रशिया आणि अमेरिकेचे संबंध वैरापासून ते संघर्षापर्यंत येऊन ठेपले आहेत. दोन्ही देश पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या काळात परतले आहेत’, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रशियन सुरक्षाविषयक परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला.

येत्या काळात उभय देशांमधील टक्कर टाळायची असेल तर थेट चर्चा आवश्यक आहे, असे आवाहन मेदवेदेव्ह यांनी केले. मेदवेदेव्ह हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मेदवेदेव्ह यांच्यामार्फत रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला सदर इशारा देऊन चर्चेच्या आवश्यकतेवर भर दिल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमि पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्याच्या आधी बायडेन यांनी रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी व रशियावर निर्बंधांची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्या चर्चेच्या प्रस्तावाला रशियन राष्ट्राध्यक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता निकालात निघाली होती. पण आता रशियानेही अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकेल, असे संकेत मिळू लागले असून अमेरिकन माध्यमांनी तसे दावेही केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मेदवेदेव्ह यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मेदवेदेव्ह यांनी अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांवर टीका केली. ‘निर्बंधांचा दबाव, धमक्या, संघर्ष, एखाद्याच्या स्वार्थाचे संरक्षण, या सगळ्या गोष्टी जगाला कायमस्वरुपी अस्थिरतेमध्ये ढकलत आहेत’, असा ठपका मेदवेदेव्ह यांनी ठेवला. युक्रेन आणि नॉर्डस्ट्रिम २ पाईपलाईनच्या बाबतीत अमेरिकेने स्वीकारलेली भूमिका म्हणजे रशियाला त्रास देण्यासाठी संघटित मोहीम सुरू असल्याचा आरोप मेदवेदेव्ह यांनी केला.

‘चार दशकांपूर्वी अमेरिका आणि सोव्हिएत रशिया फक्त धमक्या आणि निर्णायक इशारे देत नव्हते. तर उभय देशांमध्ये चर्चाही झाल्या होत्या. पण सध्या अशा चर्चा होताना दिसत नाहीत. कारण आत्ताच्या अमेरिकेचे परराष्ट्र धोरण अस्थिर बनले आहे. अंतर्गत परिस्थिती आणि जागतिक नेता म्हणून अमेरिकेची पाश्‍चिमात्य देशांमधील लयाला गेलेली प्रतिमा यासाठी कारणीभूत आहे’, अशी टीका मेदवेदेव्ह यांनी केली.

त्याचबरोबर शीतयुद्धाच्या काळातही अमेरिकेने इटली आणि तुर्कीमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केल्यानंतर, सोव्हिएत रशियाने देखील अमेरिकेच्या विरोधात क्यूबामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केली होती, याची आठवण रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी करून दिली. यापुढे अमेरिका आणि रशियामध्ये संघर्ष भडकू नये, असे वाटत असेल तर बायडेन प्रशासनाने थेट चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन मेदवेदेव्ह यांनी केले. फोनवरील चर्चेने काही साध्य होत नाही, असा टोलाही मेदवेदेव्ह यांनी यावेळी लगावला.

leave a reply