अणुहल्ल्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे उपलब्ध नसल्यास अमेरिकेला अण्वस्त्रसज्ज बॉम्बर्स सुसज्ज ठेवावे लागतील

- स्ट्रॅटकॉमच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (आयसीबीएम) उपलब्ध नसल्यास अणुहल्ल्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी अण्वस्त्रसज्ज बॉम्बर विमाने कायम सज्ज ठेवावी लागतील, असा इशारा अमेरिकेच्या स्ट्रॅटकॉम प्रमुखांनी दिला आहे. अमेरिकेच्या ‘ग्राऊंड बेस स्ट्रॅटेजिक डिटरंन्स-जीबीएसडी’साठी प्रचंड प्रमाणात खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाची आवश्यकता आहे का? असा सवाल काही संसद सदस्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना, अमेरिकेच्या स्टॅ्रटकॉमचे प्रमुख ऍडमिरल चार्ल्स रिचर्ड यांनी रशिया व चीन यांच्या अण्वस्त्रसज्जतेची माहिती देऊन त्यापासून अमेरिकेला संभावणार्‍या धोक्यांची जाणीव करून दिली.

‘जीबीएसडी’साठी अर्थात अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या विकास व संशोधनासाठी सुमारे ८५ अब्ज डॉलर्सचा निधी लागणार आहे. हा खर्च आवश्यक नसल्याचा सूर अमेरिकेच्या काही संसद सदस्यांनी लावलेला आहे. तसेच पुढच्या काळात सदर कार्यक्रमासाठी आणखी अब्जावधी डॉलर्सचा निधी लागू शकतो, याकडे हे संसद सदस्य बोट दाखवित आहेत. मात्र अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ही आवश्यक बाब आहे, असे स्टॅ्रटकॉमच्या प्रमुखांनी ठासून सांगितले. विशेषतः रशियासारख्या देशाकडे पाणबुडी, हवाई आणि क्षेपणास्त्रांच्या मार्गाने अणुहल्ले चढविण्याचे सामर्थ्य आहे व चीन देखील या आघाडीवर प्रगती करीत आहे, याकडे ऍडमिरल रिचर्ड यांनी लक्ष वेधले. हे देश आपले आण्विक सामर्थ्य वाढवित असताना, अमेरिकेला आपल्या सामर्थ्यात कपात करणारा घातकी निर्णय घेता येणार नाही व जीबीएसडीसाठी आवश्यक खर्च करावाच लागेल, असा दावा ऍडमिरल रिचर्ड यांनी केला.

जर हा खर्च मंजूर होणार नसेल आणि ‘आयसीबीएम’ अर्थात आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अणुहल्ल्यासाठी उपलब्ध राहणार नसतील, तर फार मोठी जोखीम पत्करावी लागेल. तशा परिस्थितीत आपल्याला अणुहल्ला चढविण्यासाठी बॉम्बर विमाने सदैव सज्ज ठेवावी लागतील, असे ऍडमिरल रिचर्ड यांनी बजावले. त्याखेरीज अणुहल्ल्याच्या आदेशांची अंमलबजावणी करता येणार नाही, असा इशारा ऍडमिरल रिचर्ड यांनी दिला.

शिवाय अणुहल्ल्यासाठी बॉम्बर्स तयार ठेवणे याचा अर्थ आधीच्या दशकांमध्ये वापरली जाणारी प्रक्रिया पुन्हा सुरू करणे असा होतो. शीतयुद्धाच्या काळातल्या व्यवस्थेचा वापर करून आधुनिक काळात संघर्ष करता येणार नाही, अशा थेट शब्दात ऍडमिरल रिचर्ड यांनी ‘जीबीएसडी’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले. अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची युद्धसज्जता वाढविणारे आक्रमक निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही केली होती. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेले बायडेन यांचे प्रशासन ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळा निर्णय घेईल, अशी अमेरिकेतील काही संसद सदस्यांची अपेक्षा होती. पण बायडेन प्रशासनाने संरक्षणावरील खर्च कमी केलेला नाही.

अशा परिस्थितीत जीबीएसडीवरील खर्चावर काही संसदसदस्य प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. त्याला अमेरिकेच्या लष्करी नेतृत्त्वाकडून कडाडून विरोध केला जात असून सध्याच्या काळात अमेरिकेला असलेला धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, याची जाणीव अमेरिकन संरक्षणदलांचे वरिष्ठ अधिकारी करून देत आहेत. पुढच्या काळात अमेरिकेने याआधी लढले नव्हते, अशा युद्धाला सामोरे जावे लागेल व त्याची तयारी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन यावर आवश्यक खर्च करावाच लागेल, असे अमेरिकन संरक्षणदलांचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने बजावत आहेत.

leave a reply