मुंबई, दि. ३१ (वृत्तसंस्था ) – कोरोनाव्हारसाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने दूध विक्रीत घट झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रतिलिटर दराने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील,असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
दूध विक्रीत घट झाल्याने दूधव्यवसाय, दूधउत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गावागावात दूध स्वीकारले जात नसल्याने दूध खरेदी करून उत्पादकांना दिलासा देण्यात येणार आहे. राज्यात १२ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील 10 लाख दूध अतिरिक्त आहे. खाजगी बाजारात दुधाचे दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरले आहेत. दुधाच्या किंमतीत घट झाल्याने दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे.
त्यामुळे १० लाख लिटर अतिरिक्त दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून सरकार खरेदी करणार आहे. २५ रुपये प्रतिलिटर दराने हे दूध खेरदी करण्यात येईल. या दुधाची भुकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.