जबाबदार देशांना पाकिस्तानच्या दहशतवादाची जाणीव होऊ लागली आहे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – ‘दहशतवाद व कट्टरवादी शक्तींना पाकिस्तान सहाय्य पुरवित आहे, याची जाणीव भारत फार आधीपासून करून देत आला आहे. पण आता याबाबतची जागरूकता वाढत असून जगातील जबाबदार देशांना याचे भान येऊ लागले आहे. या संकटाच्या विरोधात एकजूट करण्याची आवश्यकताही जबाबदार देशांना पटलेली आहे’, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. त्याचवेळी बालाकोट असो वा गलवान, सर्वच आक्रमकांना त्वरित व चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देश सज्ज असल्याचा संदेश देण्यात आलेला आहे, असे सूचक उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले.

जबाबदार देशांना पाकिस्तानच्या दहशतवादाची जाणीव होऊ लागली आहे - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगनॅशनल डिफेन्स कॉलेलमधील कार्यक्रमाला संबोधित करताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींची गंभीर दखल भारताने घेतलेली आहे, याची जाणीव करून दिली. पाकिस्तानसारखा देश दहशतवाद व कट्टरवादाला सहाय्य पुरवित असल्याचे फार आधीपासून लक्षात आणून देण्याचा प्रयत्न भारताने केला होता. दहशतवादाचा राजकीय हेतूसाठी वापर करण्याचे भयंकर परिणाम समोर येऊ लागल्यानंतर, यापासून असलेल्या धोक्यांची जगातील जबाबदार देशांना जाणीव झाली. तसेच सर्वांनाच ग्रासणार्‍या या संकटाच्या विरोधात एकजूट करण्याची आवश्यकताही या जबाबदार देशांना पटलेली आहे, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले.

अफगाणिस्तानात जे काही घडत आहे, त्यापासून सर्वांनीच धडा घेण्याची गरज आहे. दहशतवादी शक्ती मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करीत असून आपल्या हिंसक कारवाया सर्वसामान्य बाब म्हणून जगात रूढ करण्याची तयारी करीत आहे. ही धक्कादायक बाब ठरते, असा इशारा देऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तालिबानला लक्ष्य केले. याबरोबरच भारताच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणार्‍या आक्रमक शक्तींना त्वरित व चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे सांगून ‘बालाकोट’ व ‘गलवान’द्वारे हा संदेश भारताने दिलेला आहे, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर केलेल्या शेरेबाजीला संरक्षणमंत्र्यांनी उत्तर दिल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारत इथल्या जनतेवर अत्याचार करीत असल्याचे दावे ठोकले. तसेच भारतातील काही घटनांचा उल्लेख करून सार्‍या जगाने याची दखल घ्यावी, अशी हास्यास्पद मागणी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली. त्याला संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या प्रतिनिधींनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. ओसामा बिन लादेनचा आदरार्थी उल्लेख करणार्‍या पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाचा पर्दाफाश भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजनैतिक अधिकार्‍यांनी ‘राईट टू रिप्लाय’द्वारे केला. सार्‍या जगाला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची जाणीव झालेली आहे, असे भारताच्या प्रतिनिधी म्हणाल्या. याबरोबरच पाकिस्तानात अल्पसंख्यांक व महिला सुरक्षित नाहीत आणि अशा देशाने भारतावर केलेले आरोप म्हणजे?आपल्या कारवायांकडून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न ठरतो, असे भारताच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

leave a reply