तरन तारन – पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यातील सरहाली येथील पोलीस ठाण्यावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ने (आरपीजी) हल्ला करण्यात आला. ‘आरपीजी’चा वापर करून असा हल्ला करण्याची पंजाबमधील गेल्या सात महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी मे महिन्यात पंजाबच्या मोहालीमध्ये पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर असाच हल्ला झाला होता. पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून पाकिस्तान हे हल्ले घडवून आणत आहे. भारताला हजार जखमा देऊन रक्तबंबाळ करण्याचे शेजारी देशाचे धोरण आहे व हा हल्ला त्याचाच भाग असल्याचे, पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी म्हटले आहे. याद्वारे त्यांनी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे संकेत दिले.
तरन तारन या पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील अमृतसर-भटिंडा महामार्गावरील सरहाली पोलीस ठाण्यात रात्री एकच्या सुमारास ‘आरपीजी’चा वापर करून हल्ला करण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या हल्ल्याने पाकिस्तानमधून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे होणारा शस्त्र पुरवठा आणि खलिस्तानवादी दहशतवादाला बळ देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रणगाडे, चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यासाठी युद्धात वापरण्यात येणाऱ्या ‘आरपीजी’ सारख्या शस्त्राचा वापर दहशतवादी करीत आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे.
मे महिन्यात ‘आरपीजी’चा वापर करून मोहालीमध्ये पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे लखबिर सिंग लांडा या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’शी (बीकेआय) जोडलेल्या गँगस्टरचे नाव समोर आले होते. कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या लांडाच्या इशाऱ्यावर हा हल्ला झाला होता, हे तपासात उघड झाले होते. लखबिर सिंग लांडाचा विश्वासू सहकारी असलेल्या चरत सिंग याला काही दिवसांपूर्वी मुंबईतून अटक झाली होती. त्यानेच हा हल्ला घडवून आणला होता. तर या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला खलिस्तानी दहशतवादी हरिविंदर रिंडा याचा गेल्या महिन्यातच पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आली होती.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून पंजाबमध्ये हिंसाचार भडकीवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे याआधी काही प्रकरणात उघड झाले आहे. तसेच शस्त्र व अमली पदार्थांची तस्करीमध्येही या टोळ्या गुंतल्या आहेत. आयएसआय, दहशतवादी आणि पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांच्या संबंधांची एनआयए व्यापक चौकशी करीत असून गेल्या काही महिन्यात कित्येक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत व काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पाकिस्तान जम्मू-काश्मीरप्रमाणे पंजाबमध्येही ड्रोनद्वारे शस्त्रतस्करी करीत आहेत. यावर्षात आतापर्यंत 200 ड्रोन सीमा ओलांडून आल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या एका महिन्यात तस्करीची काही प्रयत्न उधळण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर शस्त्र व हेरॉईन जप्त करण्यात आले. तरन तारन जिल्ह्यात ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी ड्रोनद्वारे शस्त्रतस्करी केली जात असल्याची बाब पहिल्यांदा तरन तारनमध्येही उघड झाली होती. ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ याच ड्रोनद्वारे शस्त्रतस्करीतून पंजाबमधील दहशतवाद्यांच्या हातात पोहोचल्या आहेत.
दरम्यान, तरन तारनमधील हल्ल्यानंतर पंजाबमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. सातहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एनआयए व इतर तपास संस्थाही तपासात सहभागी झाल्या आहेत. लवकरच यासंदर्भात अधिक प्रकाश पडण्याची आवश्यकता आहे.