गाझापट्टी व लेबेनॉनच्या सीमेवरून इस्रायलवर ७८ रॉकेट्सचा मारा

-* इस्रायलकडून हवाई कारवाईद्वारे प्रत्युत्तर

*पॅलेस्टिनी नेत्यांची इस्रायलवर टीका
जेरूसलेम – पॅलेस्टाईनचा भूभाग असलेल्या गाझापट्टी तसेच लेबेनॉनच्या हद्दीतून गुरुवारी रात्री इस्रायलवर किमान ७८ रॉकेट हल्ले झाले. इस्रायलची आयर्न डोम हवाई यंत्रणा सदर हल्ले भेदण्यात यशस्वी ठरली. इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला आहे. त्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा व लेबेनॉनमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये हमासचे जबर नुकसान झाल्याचा दावा केला जातो. पॅलेस्टिनी नेत्यांनी इस्रायलच्या कारवाईचा निषेध करून अमेरिका व युरोपिय देशांनी इस्रायलविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गाझापट्टी व लेबेनॉनच्या सीमेवरून इस्रायलवर ७८ रॉकेट्सचा मारा - इस्रायलकडून हवाई कारवाईद्वारे प्रत्युत्तरइस्रायलच्या पोलिसांनी जेरूसलेममधील प्रार्थनास्थळाच्या आवारात केलेल्या कारवाईचा सूड घेण्याची धमकी गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने दिली होती. बुधवारी ५ एप्रिल रोजी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या इतर नेत्यांमध्ये विशेष बैठक पार पडली. यामध्ये इस्रायलविरोधी हल्ल्यांची योजना आखण्यात आली होती, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. गुरुवारी रात्री गाझापट्टीतून इस्रायलवर ४४ रॉकेट हल्ले झाले. यासाठी हमास जबाबदार असल्याचे उघड आहे.

मात्र गाझातून रॉकेट हल्ले सुरू होण्याआधी लेबेनॉनच्या दक्षिण सीमेतूनही इस्रायलच्या हद्दीत ३४ रॉकेट्सचे हल्ले झाले. लेबेनॉनच्या दक्षिणेकडील पॅलेस्टिनी निर्वासितांमधील कट्टरपंथियांच्या सहाय्याने हमासने हे हल्ले चढविल्याचा संशय व्यक्त केला जातो. इस्रायलवरील या हल्ल्यांसाठी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने हमासला किती सहाय्य केले, याची माहिती समोर आलेली नाही. गाझापट्टी व लेबेनॉनच्या सीमेवरून इस्रायलवर ७८ रॉकेट्सचा मारा - इस्रायलकडून हवाई कारवाईद्वारे प्रत्युत्तरपण इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची धमकी देणारी हिजबुल्लाह हमासला सहाय्य करण्यासाठी इस्रायलवर हे हल्ले चढवित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या रॉकेट हल्ल्यांमध्ये इस्रायलचे नुकसान झालेले नाही. आयर्न डोम या हवाई सुरक्षा यंत्रणेने बहुतांश रॉकेट हल्ले भेदले. तर काही रॉकेट्स निर्जन ठिकाणी कोसळले. पण गुरुवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलने गाझा व लेबेनॉनमधील रॉकेट हल्ल्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. गाझातील हल्ल्यात हमासची ठिकाणे नष्ट झाल्याचा दावा केला जातो. तर लेबेनॉनमधील दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचर्स मागे सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. गाझापट्टीत हमासने इस्रायलचे काही हल्ले उधळल्याची चिंता इस्रायली वर्तमानपत्राने व्यक्त केली आहे.

गाझापट्टी व लेबेनॉनच्या सीमेवरून इस्रायलवर ७८ रॉकेट्सचा मारा - इस्रायलकडून हवाई कारवाईद्वारे प्रत्युत्तरसलग दोन वर्षे गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांचा वर्षाव होत आहे. पण गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच लेबेनॉनमधून इस्रायलवर एवढ्या मोठ्या संख्येने रॉकेट्सचे हल्ले झाले आहेत. २००६ सालच्या ३४ दिवसांपर्यंत लांबलेल्या संघर्षानंतर लेबेनॉनमधून सलग रॉकेट्सचे हल्ले झाले, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. येत्या काळात इस्रायली यंत्रणा हमास, इस्लामिक जिहाद किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या प्रमुख नेत्यांचा काटा काढू शकतात, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

शुक्रवारी वेस्ट बँकमध्ये ज्यूधर्मिय निर्वासितांवर दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात दोन तरुणींचा बळी गेला तर तिसरी व्यक्ती गंभीर आहे. दरम्यान, इस्रायली पोलिसांनी प्रार्थनास्थळात केलेल्या कारवाईमुळे संघर्ष भडकू शकतो, असा इशारा अरब लीगने दिला आहे.

leave a reply